मुंबई दूरदर्शनच्या ‘गजरा’चे निर्माते विनायक चासकर यांचं निधन

विनायक चासकर यांनी अनेक लोकप्रिय कार्यक्रमांची निर्मिती केली होती. त्यापैकी ‘गजरा’ हा त्यांचा सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम ठरला. त्यांनी मराठी नाट्यविभाग, विविध रंजन मंच, चित्रपट समालोचन इत्यादी विभाग सांभाळले.

    दूरदर्शन मुंबईच्या स्थापनेपासून तिथे कार्यरत असणारे निर्माते विनायक चासकर (८३ )यांचं वृद्धापकाळानं आज मध्यरात्री निधन झालं.दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयामधून पदवी घेतल्यानंतर ते मुंबई दूरदर्शन केंद्रावर निर्माते म्हणून रुजू झाले.विनायक चासकर यांनी अनेक लोकप्रिय कार्यक्रमांची निर्मिती केली होती. त्यापैकी ‘गजरा’ हा त्यांचा सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम ठरला. त्यांनी मराठी नाट्यविभाग, विविध रंजन मंच, चित्रपट समालोचन इत्यादी विभाग सांभाळले.

    गजरा या कार्यक्रमाचे ८०पेक्षा अधिक भाग प्रसारीत झाले. या कार्यक्रमातून मराठी चित्रपटसृष्टीतले आघाडीचे अनेक कलाकार लोकप्रिय झाले. लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर, किशोर प्रधान, शोभा प्रधान, शं. ना. नवरे, रत्नाकर मतकरी, सुमती गुप्ते, विनय आपटे, सुरेश खरे हे त्यापैकीच काही. १९८४ सालच्या, त्यांची निर्मिती असलेल्या ‘स्मृतीचित्रे’ या त्यांच्या कार्यक्रमाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. त्याचबरोबर त्यांच्या ‘आश्रित’ या नाटकालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.