दर पंधरा दिवसांनी नवी मुंबईचा दौरा; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

अनेकदा काही बाबी मंत्रालयात जाऊन सोडवल्या जातात असे नाही त्यामुळे आजचा दौरा हा सिडकोमध्ये केला. मविआ सरकारमध्ये उद्घव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रगतीशील काम करतोय. आजच्या दौऱ्यात आम्हाला अनेक निवेदने देण्यात आली. या समस्यांबाबत आम्ही अधिकाऱ्यांना सांगितले आहे जे तुमच्या स्तरावर आहेत ती समस्या सोडवा, जे अधिकार तुम्हाला नाहीत ते नगरविकास खात्याकडे पाठवा; आम्ही ते सोडवू.

    नवी मुंबई : मी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करणारा नाही. कायम लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देत आलेलो आहे. याआधी आमचे नेते प्रत्येक जिल्ह्यांत त्यांचे काम करायचे आमची साथ त्यांना असायची म्हणून कामे होत होती. आता राजकीय परिस्थिती बदलली असली तरी तेव्हा सरकार आमचेच होते.

    आता राजकीय परिस्थिती बदलली असली तरी नवी मुंबई, पनवेल उरणला कायम प्राधान्य (Priority to Navi Mumbai, Panvel)  राहणार आहे. त्यामुळेच आम्ही दर पंधरा दिवसांनी नवी मुंबई पालिका, सिडको व एमआयडीसीचे दौरे (Tour Of NMMC, Cidco, Midc) पालकमंत्री एकनाथ शिंदे व मविआच्या नेत्यांसोबत करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी मुंबईत (Ajit Pawar In Navi Mumbai) केली गुरुवारी त्यांनी सिडकोच्या कामकाजाबाबत आढावा बैठक (Review Meeting) घेतली त्यावेळी ते बोलत होते.

    अनेकदा काही बाबी मंत्रालयात जाऊन सोडवल्या जातात असे नाही त्यामुळे आजचा दौरा हा सिडकोमध्ये केला. मविआ सरकारमध्ये उद्घव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रगतीशील काम करतोय. आजच्या दौऱ्यात आम्हाला अनेक निवेदने देण्यात आली. या समस्यांबाबत आम्ही अधिकाऱ्यांना सांगितले आहे जे तुमच्या स्तरावर आहेत ती समस्या सोडवा, जे अधिकार तुम्हाला नाहीत ते नगरविकास खात्याकडे पाठवा; आम्ही ते सोडवू.

    आमच्या मंत्रीपदाचा उपयोग जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी होणे गरजेचे आहे. सिडकोबाबत तक्रारी आहेत त्याचा आढावा घेतला. नवी मुंबईतील गरीब व गरजूंसाठी एसआरए ईजना राबवण्यासाठी प्रयत्नांत आहोत. नवी मुंबईत गरीब गरज राहोत. गरजेपोटी घरे, सिडको व खासगी जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी चर्चा झाली. रेल्वे स्थानकांच्या पार्किंग परिसरात सिडको इमारती उभारत आहे. आम्ही देखील संभ्रमात होतो.

    मात्र यात पार्किंग तसेच मोकळ्या जागा देखील ठेवल्याचे सिडको एमडी यांनी प्रेझेंटेशनमध्ये दाखवले त्यामुळे मोकळ्या जागांचा प्रश्न अडणार नाही. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खा. सुनील तटकरे, माजी खा. आनंद परांजपे, सिडको एमडी संजय मुखर्जी, नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजित बांगर, पनवेल पालिका आयुक्त गणेश देशमुख, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन सिंग, अशोक गावडे, प्रशांत पाटील, नामदेव भगत, सलूजा सुतार, सपना गावडे, संदीप सुतार, तनुजा मढवी तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

    गरजेपोटी घरांच्या प्रश्नासाठी सिडकोने मागितली वेळ

    नवी मुंबईतील गरजेपोटी घरांच्या प्रश्नांबाबत अजित पवारांनी सिडको एमडी मुखर्जी यंच्याशी चर्चा केली. हा नवी मुंबई, पनवेल उरणचा ज्वलंत प्रश्न आहे. तो त्वरित सोडवावा. जर तुम्हाला यात मार्ग मिळत नसेल तर तसे सांगा मंत्रालयातून मार्गदर्शन करण्याची सुविधा देऊ असे सिडको संचालक मुखर्जी यांस सांगितले. त्यावर सिडको एमडी यांनी काही दिवसांचा अवधी मागून घेतल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

    अजित पवारांनी घेतली सिडको एमडींची बाजू

    स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व दि. बा पाटील हे मोठे नेते होते. या दोघांचे नाव विमानतळाला द्यावे यासाठी मागणी होत आहे. राज ठाकरे यांनी छत्रपतींचे नाव विमानतळाला द्यावे अशी मागणी केली आहे. २०२४ ला विमानतळ सुरू होणार आहे. आम्हाला हा प्रश्न समोपचाराने घ्यावा लागेल असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तसेच सिडकोने स्वतः हा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव हा स्वतः घेतलेला आहे असे वाटते का?  असे म्हणत अजित पवारांनी एकप्रकारे सिडको एमडींची या वादग्रस्त नामकरण मुद्द्यावर बाजू घेतली.

    सिडको महामंडळ अध्यक्षपद शिवसेनेकडे ?

    महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असल्याने राज्यातील महामंडळाचे वाटप रखडले आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  सिडको महामंडळ अध्यक्षपदाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, ज्या खात्याकडे जे मंडळ येत त्याच मंत्र्याला त्या मंडळाचा अध्यक्ष करायचे असा विचार सुरू असल्याचे ते म्हणाले. अजित पवारांनी सिडको अध्यक्षपदाबाबत केलेल्या वक्तव्याने या महामंडळ वाटपाबाबतचा प्रश्न सुटण्यापेक्षा गोंधळाची शक्यता निर्माण झाली आहे. याआधीच राष्ट्रवादीतील अनेक स्थानिक पदाधिकारी सिडको अध्यक्षपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याने अजित पवारांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीत नाराजी पसरण्याची शक्यता आहे.

    सिडको व्यवस्थापकीय संचालकांची कानउघडणी

    प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप करण्याबाबत अजित पवारांनी सिडको एमडी डॉ. संजय मुखर्जी यांची कानउघडणी केली. हा प्रश्न त्वरित सोडवा. सर्व गोष्टी पैशात मोजता येत नाहीत. जर प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जमिनी दिल्या नसत्या तर सिडकोला येथे पाय ठेवता आला असता का? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला.