वटपौर्णिमेच्या वाणासाठी फळे न मिळाल्याने महिलांमध्ये नाराजी, धान्याचे वाण देऊन अखेर साजरा केला सण

डोंबिवली : कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये म्हणून सर्वांनाच लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे लागत आहे. सर्वच सण-उत्सवांवर कोरोनाचे सावट आहे. हे कमी की काय म्हणून निसर्ग वादळाने कोकणासह सर्वांनाच

 डोंबिवली : कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये म्हणून सर्वांनाच लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे लागत आहे. सर्वच सण-उत्सवांवर कोरोनाचे सावट आहे. हे कमी की काय म्हणून निसर्ग वादळाने कोकणासह सर्वांनाच झोडपून काढले आहे. वटसावित्री पूजनाच्या नंतर सुवासिनींना देण्यात येणाऱ्या वाणात फणसाचे गरे पाहिजेतच असा सर्वसाधारण समज महिलांमध्ये असतो. पण लॉकडाऊन आणि निसर्ग वादळ या संकटामुळे डोंबिवलीत फणस आले नाहीत. परिणामी महिला वर्गाला फणस मिळाले नसल्याने वटसावित्री दिनी डोंबिवलीतील महिलांमध्ये नाराजी दिसून आली.

डोंबिवलीत वटसावित्री सणानिमित्त कोकणातून सुमारे ४०० ते ५०० ट्रक कापे व बरके फणस डोंबिवलीत येत असतात. पूर्व-पश्चिम विभागातील प्रत्येक चौका-चौकात या फणसाच्या खरेदीसाठी पुरुषवर्ग व महिला यांची फार मोठी गर्दी असते. पण यावर्षी कोरोनामुळे असलेल्या संचारबंदीमुळे कोकणचा फळ उत्पादक शेतकरी मुंबईत फिरकला नाही. तर थोड्या प्रमाणात मुंबईत व्यवसायासाठी फणस आणणाऱ्या व्यापाऱ्याना निसर्ग वादळामुळे तेही शक्य झाले नाही. विशेष म्हणजे ठाणे लगत असणाऱ्या आदिवासी पट्ट्यातील शेतकरीही वाहतूक व्यवस्था नसल्याने शहरात फिरकला नाही. यामुळे करवंद, जांभूळ, अळू ही महत्वाची फळफळावळ महिलांना वाणात देता आली नाहीत.

डोंबिवलीत काही उत्साही लोकांनी जवळील ग्रामीण भागातून फणस विक्रीसाठी आणल्याची माहिती समोर आली. पण जो फणस ४०-५० रुपयांना मिळत असे त्याची किंमत ४००-५०० रुपये घेऊन कोरोना परिस्थितीचा फायदा अशा काही मंडळींनी करून घेतला. काही ठिकाणी १०० रुपये पाव किलो भावाने फणस विकण्यात येत होता. परंतु सर्वसाधारण महिलांना फणस, करवंदे, जांभूळ आदी फळे न मिळाल्याने वटसावित्री साजरी करतांना उत्साह जाणवला नाही. अखेर पर्याय म्हणून काही महिलांनी धान्यांचे वाण देऊन एक नवी प्रथा समोर आणली. नेहमी पारंपरिक वेशभूषेत नटून थटून एकत्रीत वटसावित्री सण साजरा करणाऱ्या महिलांना एकटेपण जणवल्याने महिला वर्गात उत्साह कमी होता.  ‘कोरोना का रोना’ कधी संपणार अशी विधानेही महिला वर्गात होत होती.