Repercussions of change of officers in the General Assembly All departments of TMC will have operations Mayor Naresh Mhaske

एकिकडे ठाणे महापालिकेचे(thane corporation) उत्पन्न घटले असताना, सार्वजनिक स्वच्छतागृहात कडी-कोयंडे तुटले असताना महापौरांसह पदाधिकाऱ्यांना नव्या मोटारीची ऐट शोभते का, असा सवाल भाजपाचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे(manohar dumbre) यांनी केला आहे.

  वसंत चव्हाण, ठाणे: महापौर(mayor) नरेश म्हस्केंसह(naresh mhaske) पदाधिकाऱ्यांसाठी मोटार खरेदी(car purchasing) करण्याचा निर्णय घेऊन बहुमताने तो रेटणाऱ्या ठाण्यातील शिवसेना नेत्यांना ताळ्यावर आणण्याबरोबरच कार खरेदी रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना cm@maharashtra.gov.in या आयडीवर हजारोंच्या संख्येने ई-मेल पाठवावेत, असे आवाहन भाजपाचे ठाणे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे यांनी केले आहे.

  एकिकडे ठाणे महापालिकेचे उत्पन्न घटले असताना, सार्वजनिक स्वच्छतागृहात कडी-कोयंडे तुटले असताना महापौरांसह पदाधिकाऱ्यांना नव्या मोटारीची ऐट शोभते का, असा सवालही डुंबरे यांनी केला आहे.

  कोरोना आपत्तीमुळे महापालिकेचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटले आहे. अशा परिस्थितीत काटकसर करण्याची गरज अर्थसंकल्पाच्यावेळी व्यक्त झाली होती. त्याचबरोबर नगरसेवकांचा निधी, दिव्यांग व विधवा महिलांना अनुदान आदीच्या खर्चात कपात झाली. मात्र, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत उधळपट्टी सुरू ठेवली आहे.

  काहीही गरज नसताना महापौर नरेश म्हस्के यांना १९ लाख ६७ हजार रुपयांची ह्युंदाई एलंत्रा, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृहनेते अशोक वैती, स्थायी समितीचे सभापती संजय भोईर यांना प्रत्येकी दहा लाख ९३ हजारांची होंडा सिटी, माजिवडा मानपाडा प्रभाग समितीचे सभापती भूषण भोईर, वर्तकनगर प्रभाग समितीच्या सभापती राधिका फाटक आणि महिला-बालकल्याण समितीच्या सभापती राधाबाई जाधवर यांना स्विफ्ट डिझायर दिली जाणार आहे. त्याची एकत्रित किंमत १८ लाख ४५ हजार रुपये आहे. या संदर्भात स्थायी समितीत बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

  या प्रस्तावावर बोलणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनाही नवी गाडी देण्याचा निर्णय घेतला गेला. त्यातून जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचे दिसून आले. ठाण्यातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचे कडी-कोयंडे तुटलेले आहेत. नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. त्याबाबत ठाण्यातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी डोळ्यावर झापडे लावली आहेत. मात्र कारखरेदीच्या पदाधिकाऱ्यांच्या मौजेला स्थानिक नेत्यांकडून समर्थन दिले जात आहे. त्यामुळे या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागण्यात येणार आहे, असे डुंबरे यांनी सांगितले.

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना आपत्तीच्या काळात महापालिकेच्या संपत्तीवर कार खरेदीची मौज करणाऱ्या महापौर नरेश म्हस्के यांच्यासह पदाधिकाऱ्यांना आवरावे. तसेच महापालिकेत मंजूर केलेला ७० लाखांच्या कारखरेदीचा प्रस्ताव रद्द करावा, अशा आशयाचे ई-मेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवावे, असे आवाहन महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे यांनी केले आहे. तसेच cm@maharashtra.gov.in या ई-मेलवर आयडीवर ठाणेकरांनी हजारोंच्या संख्येने ई-मेल पाठवून ७० लाखांची कार खरेदी रद्द करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती डुंबरे यांनी ठाणेकरांना केली आहे.