ठाण्यात ४५ लाखांच्या ३० ऍम्ब्युलन्स पडल्यात धूळ खात, फाईलींची ने-आण करण्यासाठी होतोय वापर

ठाणे पालिकेच्या अनेक योजना या लोकहिताच्या आहेत. मात्र त्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने त्या कागदावरच्या योजना राहिल्या आहेत. याला जबाबदार कोण? असा सवाल मनसेचे स्वप्नील महिन्द्रीकर यांनी उपस्थिती केला आहे. तर याला जबाबदार आणि दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना तात्काळ आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने ठाणे महापालिकेने रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तब्बल ४५ लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र सध्या या ३० बाईक ऍम्ब्युलन्स धूळ खात पडल्या आहेत.

ठाणे पालिकेच्या अनेक योजना या लोकहिताच्या आहेत. मात्र त्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने त्या कागदावरच्या योजना राहिल्या आहेत. याला जबाबदार कोण? असा सवाल मनसेचे स्वप्नील महिन्द्रीकर यांनी उपस्थिती केला आहे. तर याला जबाबदार आणि दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे.

तब्बल ३० बाईक ऍम्ब्युलन्स या एक वर्षापेक्षा जास्त काळ पालिकेच्या विविध प्रभाग समितीत किंवा रुग्णालय आणि पालिकेच्या मुख्यालयात धूळ खात पडलेल्या आहेत. या बाईक ऍम्ब्युलन्ससाठी पालिकेने ठाणेकरांचा ४५ लाखाचा निधी खर्ची केला. त्याचा उपयोगच झालेला दिसत नाही. बाईक ऍम्ब्युलंस शुभारंभानंतर पंधरवड्यातच त्या दिसणे बंद झाले.

कोरोनाच्या काळात रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नव्हत्या. तेव्हा या बाईक ऍम्बुलन्सचा वापर करता आला असता. मात्र पूर्ण कोरोनाच्या काळात या बाईक ऍम्ब्युलन्सचा वापरच झालेला नसल्याचा आरोप मनसेच्या स्वप्नील महिन्द्रीकर यांनी केला आहे. या ३० बाईक ऍम्ब्युलन्सपैकी १५ ऍम्ब्युलन्स या विविध प्रभाग समिती आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असल्याचा तपशील पाठविण्यात आल्या. मात्र अन्य १५ बाईक ऍम्ब्युलन्स आहेत कुठे, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

जबाबदारांवर कारवाई करा

ठाणेकरांच्या ४५ लाखाचा चुराडा करून बाईक ऍम्ब्युलन्स धूळ खात पडलेल्या आहेत. दुसरीकडे याचा वापर करण्यात यावा आणि ठाणेकरांना त्याचा फायदा व्हावा, अशी मानसिकता पालिका आयुक्तांची असताना याकडे दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे महिन्द्रीकर यांनी केली आहे. याबाबत पालिका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र बाईक ऍम्ब्युलन्स बाबत नोडल अधिकारी याना माहितीच नसल्याचं दिसून येतंय.