संचारबंदीत रानडुकराची शिकार ;  बंदूकधारी म्होरक्यासह १५ शिकारी फरार

भिवंडी - शिकारीची हौस भागवण्यासाठी काही नागरिक जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासींना घेऊन संचारबंदीतही जंगलातील रानडुक्कराची शिकार करण्यासाठी जंगलात आल्याची माहिती वन

भिवंडी – शिकारीची  हौस भागवण्यासाठी  काही नागरिक जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासींना घेऊन संचारबंदीतही जंगलातील  रानडुक्कराची शिकार करण्यासाठी  जंगलात आल्याची माहिती  वन अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे शिकाऱ्यांच्या टोळीला पकडण्यासाठी सापळा रचला असता वन कर्मचाऱ्यांच्या जाळ्यात  १०० किलोच्या  रानडुक्कराची शिकार करताना  दोन शिकाऱ्यांना रंगेहात अटक केली. मात्र  शिकाऱ्यांचा बंदूकधारी मोरक्या  १५ शिकारींसह फरार  झाला असून वन विभागाचे पथक त्यांचा शोध घेत आहे. रान डुकराची शिकार करण्यासाठी शिकऱ्यांनी बंदुकीतून १२ बोअरच्या काडतुसातून गोळी झाडल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आले आहे. हि घटना भिवंडी तालुक्यातील सागाव-देवचोळे येथील शासकीय वनक्षेत्रात घडली आहे.

या प्रकरणी पडघा वन परिक्षेत्र कार्यायात वन्य जीव अधिनियमच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शरद गजानन भोईर (वय २८, रा. माशोडीपाडा, भिवंडी) बाळू जयराम गवारी (वय २५ ,रा. चिंचवली (कुंदे) ) असे अटक केलेल्या शिकाऱ्यांची नावे आहेत.  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉलडाऊन संचारबंदीचा निर्णय सरकारकडून  घेण्यात आला. त्यातच  लॉकडाऊनमुळे  मटण – मासे  यांचा तुटवडा असल्याने  काही शिकाऱ्यांनी  हौस भागवण्याच्या उद्देशाने  ठाणे जिल्ह्यातील अनेक आदिवासी भागात स्थानिक आदिवासी यांना हाताशी धरून काही शिकारी जंगलातील मोर,ससे, भेकर,लावरी, रानडुक्करसह  इतर  वन्यजीवांच्या शिकारीसाठी सापळे, फास लावताना दिसून येत असल्याची माहिती पडघा वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच  अनेकदा शिकारीसाठी जंगलांना आगी लावल्या जातात आणि त्याची परिणती मोठ्या वणव्यात होऊन सर्व जंगले खाक होऊन जात असल्याचे सांगत  एक छोटी शिकार करण्यासाठी शिकारी संपूर्ण जंगल पेटवून वनसंपदेचे अतोनात नुकसान करीत आहे. यासाठी वनविभाग गावपातळीवर जाऊन ग्रामस्थांचे प्रबोधन करून आशा प्रकारांना अटकाव करण्याचा प्रयत्न करत आहे.

मात्र काही  विकृत मानसिकतेचे लोक  जंगलाच्या ऱ्हासास कारणीभुत ठरत असल्याचेही त्यांनी  सांगितले. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्शवभूमीवर  लॉकडाऊन व संचारबंदीमुळे अत्यंत कमी कर्मचारी  उपस्थितीत असताना वन गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणे जिकिरीचे असतानाही केवळ  राष्ट्रीय वनसंपतीचे रक्षण जीवावर उदार होऊन वन कर्मचारी करताना दिसून येत आहेत. अटकेत असलेल्या २ आरोपींना मंगळवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना २५ एप्रिलपर्यंत फॉरेस्ट कस्टडी सुनावण्यात आली  असून उपवनसंरक्षक ठाणे डॉ.रामगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा.वनसंरक्षक बी टी कोळेकर व वनपरिक्षेत्र अधिकारी संजय धारवणे अधिक तपास करीत आहेत. तर या  कारवाईत पडघा वनपरिक्षेत्रातील वनपाल अशोक काटेसकर,आर एन गोरले,जे जी भोईर ,वनरक्षक अजय राठोड,अमित कुलकर्णी,शरद म्हाडा  या पथकाने सहभाग घेतला. मात्र या कारवाईमुळे परिसरातील सराईत शिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून मुक्या वन्यप्राण्यांना आता त्यांच्या आश्रयस्थानात मुक्त संचार करता येणे शक्य आहे.

दरम्यान सध्या कोरोंना विषाणूने जगभरात थैमान घातलेले असताना विविध देशातील वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीच्या ठिकाणी सहज मुक्त संचार करतानाचे दृश्ये , व्हिडिओ व्हायरल  होत आहेत. त्यातच भारतातील जंगले विशेषत: महाराष्ट्रातील जंगले ही वैविध्यपूर्ण पक्षी,प्राणी, वृक्षसंपदेंने संपन्न असून वनविभाग व पक्षीमित्र, प्राणीमित्र यांच्या एकत्रित प्रयत्नांनी आतापर्यंत या वनसंपदेत उल्लेखनीय वाढ झाल्याचे पडघा वनपरिक्षेत्रातील वनपाल अशोक काटेसकर यांनी सांगितले.