sandip deshpande

कल्याण : सविनय कायदेभंग आंदोलन प्रकरणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे(sandip deshpande) यांच्यावर कल्याण रेल्वे पोलिसांनी १०७ अंतर्गत कारवाई करण्यात आली. या प्रकरणी आज कल्याण रेल्वे एसीपी कार्यालयात सुनावणी(kalyan hearing) होती. या सुनावणीसाठी संदीप देशपांडे आज कल्याण रेल्वे एसीपी कार्यालयात हजर झाले होते. यावेळी बोलताना संदीप देशपांडे यांनी आम्ही जे आंदोलन केले ते लोकहितासाठी केलं. कायद्याची प्रोसिजर ते आता पार पाडत आहेत, मात्र त्यांनी हे लक्षात ठेवावं ज्यावेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं सरकार येईल. तेव्हा हा सर्व हिशोब चुकता होईल आता जो जो त्रास देतोय ते लक्षात ठेवतोय असा इशारा दिला.

मुंबई लोकल सर्वसामन्यांसाठी लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून २१ सप्टेंबर रोजी लोकल प्रवास करत सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, मनसे नेते संतोष धुरी, गजानन काळे, अतुल भगत सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर शासनाच्या आदेशाचे उल्लंघन, विना तिकीट प्रवास तसंच रेल्वे अधिनियम कलम १४७, १५३, १५६ अन्वये कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी संदीप देशपांडेसह काही मनसे नेत्यांना यांना अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती.

याप्रकरणी १०७ कलमाअंतर्गत कल्याण रेल्वे एसीपी कार्यालयात आज सुनावणी झाली. या सुनावणीसाठी संदीप देशपांडे यांच्यासह मनसे नेते गजानन काळे, अतुल भगत, संतोष धुरी आज कल्याण रेल्वे एसीपी कार्यालयात हजर झाले. रेल्वे पोलिसांनी देशपांडे यांच्या जामीनीकरीता क्लास वन अधिकारी लागतील असे सांगितले. त्यावेळी मनसेच्या वतीने तीन क्लास वन अधिकारी व एक पीएचडी होल्डर जामीनदार सादर केले गेले. पीएचडी होल्डर जामीनदाराने देशपांडे यांना जामीन दिला तर अन्य तीन क्लास वन अधिकाऱ्यांनी तीन कार्यकर्त्यांना जामीन दिला.

तर सोनाराने कान टोचले ते बरं झालं, आम्ही सरकारला सांगून ऐकत नव्हते. या सरकारने कानात कापसाचे बोळे घातले आहेत का माहिती नाही. पण हाय कोर्टाने कान टोचले आहेत. त्यामुळे सरकारने आतातरी सुधारलं पाहिजे. लोकांची उपासमारी होत आहे. लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. आज तीच गोष्ट हायकोर्टाने म्हटली आहे. सरकार घरी बसून जबाबादरी सांभाळत आहे. सरकारने सर्वसामान्यांची जबाबदारी घेऊन रेल्वे चालू केली पाहिजे, अशी मागणीदेखील संदीप देशपांडे यांनी केली.