
कंत्राटदाराला मोफत भूखंड देण्याच्या निर्णयातील बाबींची आजच्या महासभेत नगरसेविका अर्चना मणेरा यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच गेल्या महासभेनंतर आतापर्यंत महापालिकेने केलेल्या कार्यवाहीची माहिती विचारली. त्यावेळी संबंधित कंत्राटदाराला नाममात्र दरानेच भूखंड द्यावयाचा असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
ठाणे : मेट्रो प्रकल्पाच्या कंत्राटदाराला मोफत देण्यात आलेल्या भूखंडाप्रकरणी (metro plot) महापौर नरेश म्हस्के (Naresh mhaske) यांनी संबंधित भूखंडाचे भाडे रेडीरेकनर दराने आकारण्याचा निर्णय दिला आहे. मात्र, या निर्णयाबाबत महापालिका प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. आज पुन्हा महापौरांनी संबंधित भूखंडावरील प्रकल्प सील करण्याचा आदेश दिला. या आदेशाची तरी अंमलबजावणी महापालिका प्रशासन करणार आहे का, असा सवाल भाजपाच्या नगरसेविका अर्चना मणेरा ( BJP corporator Archana Manera) यांनी केला आहे.
मेट्रो प्रकल्पाच्या आरएमसी प्लॅंटसाठी बोरिवडे येथील मैदानाची मागणी `एमएमआरडीए’ने महापालिकेकडे केली होती. मात्र, महापालिका प्रशासनाने २०१८ मध्ये परस्पर सेक्टर ५ येथील ७५ हजार ३९० चौरस मीटर क्षेत्राची जागा दिली होती. या जागेचे भाडेही आकारण्यात आले नव्हते. त्यामुळे महापालिकेचे दोन वर्षांत दरमहा ४ कोटी रुपये भाड्याप्रमाणे ९६ कोटींचे नुकसान झाल्याकडे भाजपाच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी पत्रकाद्वारे केला होता. गेल्या महासभेत या विषयावर चर्चा झाल्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी तत्काळ दखल घेत संबंधित कंत्राटदाराकडून रेडीरेकनर दराने भाडे आकारण्याचा आदेश महापालिका प्रशासनाला दिला होता.
कंत्राटदाराला मोफत भूखंड देण्याच्या निर्णयातील बाबींची आजच्या महासभेत नगरसेविका अर्चना मणेरा यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच गेल्या महासभेनंतर आतापर्यंत महापालिकेने केलेल्या कार्यवाहीची माहिती विचारली. त्यावेळी संबंधित कंत्राटदाराला नाममात्र दरानेच भूखंड द्यावयाचा असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्याला नगरसेविका अर्चना मणेरा यांनी तीव्र आक्षेप घेतला. महापालिकेचे आर्थिक नुकसान करणारा हा निर्णय का घेतला जात आहे, असा सवाल केला. त्याला महापौर नरेश म्हस्के व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला यांनीही पाठिंबा दिला. तसेच महापालिका अधिकाऱ्यांना जबाब विचारला. अखेर महापौरांनी संबंधित कंत्राटदाराचा सेक्टर ५ येथील प्लॅंट सील करण्याचा आदेश दिला. त्याचबरोबर `एमएमआरडीए’च्या पत्रानुसार संबंधित प्रकल्प बोरिवडे येथील मैदानावर हलविण्याचे आदेश दिले.
महापौरांच्या दुसऱ्या आदेशाची तरी अंमलबजावणी करावी : अर्चना मणेरा
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वसाधारण सभा ही महत्वपूर्ण आहे. त्यात महापौरांनी दिलेला आदेश हा अंतिम असतो. सेक्टर ५ येथील जागेबाबत महापालिकेच्या हिताचा महापौरांनी दुसऱ्यांदा आदेश दिला आहे. त्याची प्रशासनाने अंमलबजावणी करावी, अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी केली.