त्या महिलेने मोबाईल हिसकावणाऱ्या चोराचा केला पाठलाग अन् दिले पोलिसांच्या ताब्यात, शहाड रेल्वे स्टेशनवर घडलेल्या घटनेची सर्वत्र चर्चा

महिलेचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या(Mobile Theft) आरोपीला कल्याण जीआरपीने(Kalyan GRP) अटक केली आहे. विशेष म्हणजे या महिलेनेच नागरिकांच्या मदतीने आरोपीला पकडून कल्याण रेल्वे पोलिसांच्या(Kalyan Railway Police) ताब्यात दिले होते.

    कल्याण : झटापटीत महिलेचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या(Mobile Theft) आरोपीला कल्याण जीआरपीने(Kalyan GRP) अटक केली आहे. विशेष म्हणजे या महिलेनेच नागरिकांच्या मदतीने आरोपीला पकडून कल्याण रेल्वे पोलिसांच्या(Kalyan Railway Police) ताब्यात दिले होते. मात्र महिलेचा मोबाईल अद्याप सापडलेला नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

    मुंबईत काम करणारी एक महिला काही कामानिमित्त शहाड येथे आली होती. ती शहाड रेल्वे स्थानकात थांबली होती. याच वेळी एक तरुण तिच्याजवळ आला. त्याने या महिलेच्या हातातील मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला, यावेळी महिलेने प्रतिकार केला मात्र तिला हिसका देऊन मोबाईल हिसकावून चोरट्याने पळ काढला. या झटापटीत महिलेचे काही दागिने गायब झाले. महिलेने पाठलाग करत चोराला पकडले. याच दरम्यान एक पोलीस कर्मचारी आणि काही नागरिक त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी या चोरट्याला पकडले. शाहरुख गफूर शेख या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १४ ऑगस्ट रोजी घडली असून अद्याप मोबाईल आणि दागिने सापडलेले नाहीत.