धक्कादायक! धावत्या रेल्वेमध्ये दरोडा टाकत महिलेवर अत्याचार

कल्याण जीआरपी पोलिसांनी या प्रकरणी तीन दरोडेखोरांना ताब्यात घेऊन इतर आरोपींचा शोध घेत आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून ट्रेन मुंबईच्या दिशेने येत असताना इगतपुरी स्थानक सोडल्यानंतर ट्रेन बोगद्याजवळ पोहोचली.

    कल्याण: धावत्या रेल्वेमध्ये काही दरोडेखोरांनी प्रवाश्यांची लुटमार करत एका महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरी ते कसारा दरम्यान लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली आहे. तसेच सात ते आठ दरोडेखोर असल्याचं समजलं जात आहे.

    कल्याण जीआरपी पोलिसांनी या प्रकरणी तीन दरोडेखोरांना ताब्यात घेऊन इतर आरोपींचा शोध घेत आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून ट्रेन मुंबईच्या दिशेने येत असताना इगतपुरी स्थानक सोडल्यानंतर ट्रेन बोगद्याजवळ पोहोचली. त्यावेळी ट्रेन स्लो असल्याने सात ते आठ जण ट्रेनमध्ये चढले. त्यांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

    हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. अनेक प्रवाशांना या दरोडेखोरांनी लुटले. धक्कादायक म्हणजे एका प्रवाशी महिलासोबत दरोडेखोरांनी छेडछाड सुरू केली. यात एका वीस वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याची माहितीसुद्धा पोलिसांनी दिली आहे. काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले.

    ट्रेन कल्याण स्थानकात येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना आपल्या ताब्यात घेतले. तसेच उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.  या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.