लेडीज बार बंद करण्यासाठी महिलांची सत्यम बारवर धडक; कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरु होता बार

बारमध्ये येणाऱ्यांच्या वाहनांच्या अस्त्यव्य्स्त पार्किंगमुळे देखील नागरिक त्रस्त होते. रात्री बारमधील डेकच्या डिस्को गाण्याचा आवाज कमी करण्यासाठी चाळीतील मुले बार मालकाकडे गेली असता त्या बार मालकाने उलट त्यांना मारण्यासाठी माणसे पाठविली.

कल्याण : कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी स्टेशन नजीक असलेल्या सत्यम या लेडीज बारवर माजी नगरसेविकेससह स्थानिक महिलांनी धडक देत बारचे शटर डाऊन करायला लावले.

कल्याण पूर्वेतील सत्यम या आँकेस्ट्रा कम लेडीज बार मधील डेकचा आवाज आणि बार मधून बाहेर पडणाऱ्या तळीरामांच्या उपद्व्यापाचा त्या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास होत होता. हा बार चाळीवाजा स्लम परिसरात असून या बार मधील बारबाला ह्या रात्री उशिरापर्यंत चाळीच्या चिंचोळ्या गल्लीतून ये-जा करीत असल्याने आबंट शौकीन, व तळीरामाची वर्दळ या परिसरात होत असल्याने परिसरातील चाळीतील महिलांकडे देखील वाईट नजरेने पाहण्याचा प्रकार घडत होते.

बारमध्ये येणाऱ्यांच्या वाहनांच्या अस्त्यव्य्स्त पार्किंगमुळे देखील नागरिक त्रस्त होते. रात्री बारमधील डेकच्या डिस्को गाण्याचा आवाज कमी करण्यासाठी चाळीतील मुले बार मालकाकडे गेली असता त्या बार मालकाने उलट त्यांना मारण्यासाठी माणसे पाठविली.

बारमधील महिला आणि ग्राहक रस्त्यावर देखील अश्लील चाळे करत असल्याने स्थानिक महिलांची मोठी कुचंबना होत होती, यामुळे स्थानिकांनी संतप्त होऊन सोमवारी माजी नगरसेविका निर्मला रायभोळे यांच्यासह स्थानिक महिलांनी सत्यम लेडीज बारवर धडक देत बारचे शटर डाऊन केले. हा बार कोळसेवाडी पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असूनही पोलीस कारवाई का करीत नाहीत असा संतप्त सवाल यानिमित्ताने महिला करीत होत्या.

दरम्यान स्थानिक लोकांनी या बारच्या आवाजाबाबत, पार्किंगबाबत आंदोलन केले असून या बार मालकाला डेकचा आवाज कमी ठेवण्याचा आणि इतर नियम पाळण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे व.पो.नि. शाहूराज साळवे यांनी दिली.