भिवंडीत व्यावसायिक तरुणाची आत्महत्या

भिवंडी: तालुक्यातील दिवे (केवणी )येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक तरुणाने(young businessman) राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या(suicide) केल्याची घटना आज पहाटे घडली आहे. त्याने प्रेम भंगातून आत्महत्या केली असावी ? असा अंदाज पोलीस(police) सूत्रांकडून व्यक्त केला जात असून त्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव देशपांडे यांनी दिली आहे.

राकेश पाटील असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.तो गोदामामध्ये टेम्पो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करून त्याच्या आईसोबत राहत होता. मोठ्या बहिणीची कालवार येथे तिच्या सासरी प्रसूती झाल्याने आई दोन दिवसांपासून तिच्याकडे गेली होती. तो एकटाच घरी होता. त्यामुळे त्याला जेवण शेजाऱ्यांकडून दिले जात होते. आज सकाळी शेजारी चहा, नाश्ता घेऊन गेले असता त्याने दरवाजा उघडला नाही. त्यावेळी खिडकीतून डोकावून पाहिले असता राकेश याच्या तोंडाला विषारी औषधाचा वास येऊन तो जमिनीवर निपचित पडल्याचे दिसून आले. त्यामुळे शेजाऱ्यांनी तात्काळ दरवाजा तोडून त्याला बेशुद्धावस्थेत उपचारासाठी स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्याचे दुर्दैवी निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या आत्महत्येची नोंद तालुका पोलीस ठाण्यात केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव देशपांडे करीत आहेत.