नाट्यवितरकांना सामावून घेत भविष्यातील नाट्यव्यवसायाची वाटचाल

वेगवेगळ्या व्यवसायांना सध्या कोरोना महामारीमुळे चांगलाच फटका बसला आहे. नाट्यव्यवसायही त्याला अपवाद नाही. बंद असलेली नाट्यगृहे परत सुरु करण्यासाठी ‘जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघा’ने शासनाला निवेदन दिले आहे.

मुंबई : वेगवेगळ्या व्यवसायांना सध्या कोरोना महामारीमुळे चांगलाच फटका बसला आहे. नाट्यव्यवसायही त्याला अपवाद नाही. बंद असलेली नाट्यगृहे परत सुरु करण्यासाठी ‘जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघा’ने शासनाला निवेदन दिले आहे. तत्पूर्वी कोविड-१९ नंतरचे नाट्यव्यवसायाचे स्वरूप कसे असायला हवे ? एकंदरीतच नाट्यव्यवसायाच्या सक्षमीकरणासाठी नेमके कोणते प्रयत्न आवश्यक आहेत याचा सातत्याने आढावा घेणाऱ्या ‘जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघा’ने नुकतीच महाराष्ट्र नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रम वितरक संघ यांच्याशी वेबसवांद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

नाट्यनिर्माता व रसिक यांच्या मधला दुवा म्हणून काम करणारा ‘वितरक’ हा नेहमीच दुर्लक्षित राहिला. नाट्यव्यवसायाच्या  सक्षमीकरणासाठी वितरकांच्या सहभागाचे महत्त्व ओळखून ‘जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघा’ने एक पाऊल पुढे टाकत वेगवेगळ्या शहरातील वितरकांना बोलतं केलं व भविष्यात नेमकं काय करणं आवश्यक आहे? याचे मुद्दे या वेबसंवादाच्या निमित्ताने चर्चिले गेले. या वेबसंवादात वितरक संघातील अनेक ज्येष्ठ मान्यवरांसह सभासद उपस्थित होते, ज्यात अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर (नाशिक), कार्याध्यक्ष गिरीश महाजन (कोल्हापूर), उपाध्यक्ष मोहन कुलकर्णी (पुणे), उपाध्यक्ष समीर पंडित  (नागपूर),  प्रमुख कार्यवाह आनंद कुलकर्णी (कोल्हापूर),  सहकार्यवाह प्रवीण बर्वे (पुणे), सहकार्यवाह संदीप सोनार (औरंगाबाद), खजिनदार समीर हंपी (पुणे), कार्यकारिणी सदस्यांमध्ये विजय कुबडे (राजापूर), गुरु वठारे( सोलापूर),राजेंद्र जाधव (नाशिक), आबा ढोले (परभणी), सभासदांमध्ये आनंद कदम (सातारा), योगेश कुष्टे (चिपळून),  किशोर सावंत (रत्नागिरी),  दादा साळुंखे (सोलापूर) राहुल बागुल (धुळे), राजु परदेशी (औरंगाबाद),  राहुल खिल्लारे (जालना), जुगल किशोर धूत (नांदेड), शिरीष कुलकर्णी (पुणे), सत्यजित धांडेकर (पुणे), नंदकुमार वाकडे (लातूर), प्रदीप मुळे (बीड), विशाल जातेगावकर (नाशिक), हेमंत गुहे (चंद्रपूर) आदींचा समावेश होता. ‘जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघा’च्या वतीने अध्यक्ष अमेय खोपकर, प्रवक्ते अनंत पणशीकर, निर्माते प्रशांत दामले, राकेश सारंग, श्रीपाद पद्माकर, दिलीप जाधव, चंद्रकांत लोकरे उपस्थित होते.

भविष्यात स्थानिक पातळीवरील खर्च कमी करून नाट्यव्यवसायाचा विचार करण्याचा महत्त्वाचा मुद्दा या चर्चेत मांडला गेला. तसेच नाट्यगृहाचे वाढीव दर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच बंद असलेली नाट्यगृहे परत सुरु करण्याचे व नाट्यगृहांची बिकट अवस्था सुधारण्यासाठी शासन दरबारी जोर वाढविणे गरजेचे असल्याचे या चर्चेत प्राधान्याने नमूद करण्यात आले. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्यांमध्ये खासगी संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या तारखा नाटकांनाच मिळाल्या पाहिजेत असा सूर ही या चर्चेत आळवला गेला. मुंबई, पुणे नाशिक वगळता छोट्या शहरी व ग्रामीण भागात नाटक पोहचिवण्याच्या प्रयत्नांसोबतच स्थानिक प्रेक्षकांच्या माहिती संकलनाचा महत्त्वाचा मुद्दाही यात अधोरेखित झाला. काही भागात नवीन नाट्यगृहांचे काम रखडले आहे. त्या रखडलेल्या कामाची त्वरित दखल घेऊन आज काही नाट्यगृहात साऊंड सिस्टिमसारख्या सुविधांसाठी वेगळे पैसे मोजावे लागतात याची गांभीर्याने दखल घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली. नाट्यगृहांच्या बुकींगसाठीच्या ऑनलाइन पद्धतीवर आक्षेप नोंदवत त्यावर तोडगा काढून नाट्यगृहे सहज उपलब्ध व्हावीत यासाठी नियोजन आवश्यक असल्याचे मत यावेळी एकमताने वितरक संघाच्या वतीने मांडण्यात आले. नाट्यगृहाच्या बुकिंगसाठी आगाऊ घेतल्या जाणाऱ्या डिपॉझिटमुळे वितरकांचे पैसे अडकले जाणार नाहीत याची खबरदारी घेऊन डिपॉझिट चेक वटवण्याबाबत निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले. वितरक जगण्यासाठी नाटकाच्या बजेटचा विचार यापुढच्या काळात महत्त्वपूर्ण असून मोठ्या शहरांप्रमाणे छोट्या भागातही नाटकं करण्यासाठी निर्मात्यांनी पुढाकार घेण्याच्या मताला निर्माता प्रशांत दामले यांनी दुजोरा दिला. या सर्व नियोजनासोबत भविष्यात नाट्यरसिकांच्या रुचीसोबत त्यांच्या सुरक्षितेची तसेच कलाकार व नाट्यरसिकांमध्ये संवादपूल निर्माण करत कम्युनिकेशन वाढवणे गरजेचं असल्याचे स्पष्ट करण्यात आले. नाटकासाठी विशेष अॅपची सोय करताना सोशल माध्यमाच्या मार्फत जाहिरातींसाठी प्रयत्न करणे तसेच वृत्तपत्रांच्या जाहिरातीबाबत दराचा विचार करणे हे काहीसे वेगळे मुद्देही या चर्चेत पुढे आले. आजवर स्थानिक वितरक व व्यवस्थापकांना गृहीत न धरता नाटकांच्या आखणीचा विचार होत होता, आता त्यांना सामावून घेत भविष्यातील नाट्यव्यवसायाची वाटचाल करावी लागणार आहे. ‘जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघा’ने एक पाऊल पुढे येत केलेल्या प्रयत्नाला दाद देत वितरक संघाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी यावेळी ‘जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघा’चे आभार मानले.