भूलभूलैय्या बोगद्यांच्या आत वसलेले शहर; भेट देण्यासाठी दरवर्षी येतात लाखो लोकं

स्थानिक लोक यास कारिज-ए-किश आणि किश कनत असे म्हणतात. शेकडो वर्षांपूर्वी तिथे वास्तव्यास असणाऱ्या लोकांनी ताज्या व स्वच्छ पाण्याचा पुरवठा आणि शेतीसाठी या भूमिगत बोगद्यांची निर्मिती केली होती.

इराणच्या किश बेटावर बोगद्यांच्या भूलभूलैय्याचे एक शहर आहे. हे शहर अज्ञात असून ते भूमिगत आहे. या शहराची निर्मिती एक हजार वर्षांपूवी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. या बोगद्यांद्वारे ताज्या पाण्याचा पुरवठा या शहरात करण्यात येत होता. तसेच घुसखोरीला आळा घालण्यासाठी या बोगद्यांमध्ये साप सोडले जात होते. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे या शहराला कोणतेही नाव नाही.

स्थानिक लोक यास कारिज-ए-किश आणि किश कनत असे म्हणतात. शेकडो वर्षांपूर्वी तिथे वास्तव्यास असणाऱ्या लोकांनी ताज्या व स्वच्छ पाण्याचा पुरवठा आणि शेतीसाठी या भूमिगत बोगद्यांची निर्मिती केली होती. हे पाणी विहिरी व कालव्यांच्या माध्यमातून बेटाच्या चहूबाजूस पाठविले जात होते. पाणीपुरवठ्याच्या या व्यवस्थेस कानाट्स असे म्हणतात. आता या भूमिगत शहराची लांबी फक्त तीन हजार मीटर एवढीच राहिली आहे. या शहराला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता या बोगद्यांमध्ये संग्रहालय, आर्ट गॅलरी, हस्तकला कार्यशाळा व इतर सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.