‘बच्चा बाजी’ अफगाणिस्थानातील एक विकृत प्रथा; प्रथेच्या नावाखाली होतो लैंगिक अत्याचार

विकत घेतल्यानंतर हे अय्याश अफगाणी श्रीमंत लोक मुलांचा आपल्या मर्जीनुसार तसेच 'लैंगिक गुलाम' म्हणून वापर करतात. पुढे आणखी वय वाढल्यानंतर साधारणपणे एकोणिसाव्या वर्षी..

  तालिबानने अफगाणिस्तानमधील बहुतांश भागावर आपला कब्जा केला आहे. त्यामुळे विमानतळापासून ते रस्त्यांपर्यंत सर्वत्र तालिबानचेच नियंत्रण आहे. येथील नागरिक दहशतीमुळे आणि भीतीपोटी आपला देश सोडून दुसऱ्या देशात जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

  असे म्हटले जात आहे की, तालिबानच्या राजवटीत महिलांचे स्वातंत्र्य पूर्णपणे हिरावून घेतले जाईल. महिला आणि मुलांवर भयानक अत्याचार होतील आणि देशात अनेक कुप्रथांना सुरुवात होईल (Dirty facts of Afghanistan).

  परंतु सर्व वाईट प्रथा-परंपरा तालिबानमुळेच येतील असे नाही, तर काही वाईट परंपरा फार आधीपासूनच अफगाणिस्तानात सुरू आहेत. यातील एक परंपरा म्हणजे ‘बच्चा बाजी’

  ‘बच्चा बाजी’ म्हणजे मुलांची सट्टेबाजी! अफगाणिस्तानात ही प्रथा लहान मुलांच्या वेश्याव्यवसायाशी जोडलेली आहे. ही एक अशी परंपरा आहे, ज्याला जगभरातून विरोध केला जात आहे. अफगाणिस्तानबरोबरच पाकिस्तानमध्येही मुलांच्या सट्टेबाजीची परंपरा आहे. अशा परिस्थितीत, हे जाणून घेणे आवश्यक आहे की ही कुप्रथा नेमकी काय आहे व तिला विरोध का केला जात आहे? माहिती वाचून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.

  या प्रथेमध्ये मुलांना मुलींचे कपडे घालून, खोटे स्तन लावून, मेक-अप करून आणि पायात घुंगरू बांधून अश्लील गाण्यांवर पार्ट्यांमध्ये नाचवले जाते. ‘ऐ लड़के, तुमने मेरे बदन में आग लगा दी है’ यासारखे गाण्यांचे बोल असतात. एकदा का मुलाने मुलीसारखा मेक-अप केला की त्यानंतर तो कायमच या गर्तेत फसत जातो.

  असं म्हटलं जातं की डान्स केल्यानंतर पुरुष लोक या मुलांवर बलात्कार करतात आणि त्यानंतर ही मुले या दलदलीत फसत जातात. या प्रथेमध्ये महिलांसोबतही गैरवर्तन केले जाते, ज्यामुळे या प्रथेवर टीका केली गेली आहे.

  अनेकदा दहा ते अठरा वयोगटातील मुलांना त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी त्यांचे शरीर आणि नृत्य कौशल्य विकण्यास भाग पाडले जाते. देखण्या मुलांना लक्ष्य केले जाते. यातील काही मुले नोकरी, शिक्षण किंवा भलं करण्याचे आश्वासन देऊन त्यांच्या कुटुंबांकडून घेतली जातात. मुख्यतः त्यांच्या कुटुंबियांना या गोष्टीची जाणीव नसते की मुलांचे 'लैंगिक गुलाम' म्हणून लैंगिक शोषण केले जात आहे.

  जुनाट आणि प्रतिगामी विचारसरणीचे लोक असल्यामुळे व तेथील नियमांमुळे स्त्रिया बहुतेक सार्वजनिक ठिकाणी भेट देऊ शकत नाही आणि त्यांना पार्टी व नृत्य करण्यास मनाई आहे. त्यामुळे नाचणाऱ्या महिलांची जागा या मुलांना घ्यावी लागली आहे.

  स्त्रियांशी संवाद साधणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य असल्याने प्रौढ पुरुषांचे मनोरंजन करण्यासाठी ‘डान्स’ शिकवलेली अल्पवयीन मुले कामी पडतात. मग पारंपारिक अफगाणी संगीताच्या तालावर हे लोक अक्षरशः बेधुंद होतात. मैफिल संपल्यावर पुरुष त्यांच्या आवडत्या नृत्य करणाऱ्या मुलाबरोबर रात्र घालवण्याच्या संधीसाठी उत्सुक असतात.

  ज्या पुरुषांना स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त इंटरेस्ट असतो, असे पुरुषही मैफलीला हजेरी लावतात.

  बरीच मुलं अशा लोकांच्या तावडीतून बाहेर आली आहेत आणि त्यांनी त्यांच्या वेदना कथन केल्या आहेत. तसेही अफगाणिस्तानमध्ये समलैंगिकतेला गैर-इस्लामिक आणि अनैतिक मानले जाते. तेथे ही प्रथा अगदी सामान्य गोष्ट आहे, ज्यात मुलांवर बलात्कार होतात.

  या मुलांना इथे ‘लौंडे’ किंवा ‘बच्चा बेरीश’ (Bacha baireesh) म्हणून संबोधले जाते. अल्पवयीन मुलांना या प्रथेत नेहमी ढकलले जाते. या कुप्रथेवर आधारित ‘द डान्सिंग बॉइज ऑफ अफगाणिस्तान’ या नावाची एक डॉक्यूमेंट्री फिल्म अफगाणिस्तानातील पत्रकार नजीबुल्लाह कुरैशी यांनी बनवली होती. ही फिल्म ब्रिटनमध्ये मार्च 2010 मध्ये दाखवली गेली आणि पुढील महिन्यात अमेरिकेत प्रसारित झाली.

  ही मुले कुठल्या ना कुठल्या मैफलीला जातात आणि तथाकथित उच्चवर्गीय लोकांचं नृत्य करून मनोरंजन करतात. या मुलांना या कामाच्या बदल्यात फक्त कपडे आणि अन्नच मिळते. परंतु गरीब परिस्थितीमुळे आणि जीवन जगण्यासाठी ही हतबल मुलं असले काम करण्यास तयार होतात.

  अनेकदा मुलांचे अपहरण करून त्यांना या ‘बच्चा बाजी’साठी विकण्यात येते. ज्या मुलांना अजून दाढी आणि मिशी आलेली नाही, अशी मुलं या कामासाठी उपयुक्त मानली जातात. अशा मुलांचे अपहरण करून ती श्रीमंत व वयस्कर व्यक्तींना विकली जातात. अफगाणिस्तानातील ‘कॅरोल स्ट्रीट’वर ‘बच्चा बाजी’च्या खूप साऱ्या DVD विक्रीस उपलब्ध असतात.

  अफगाणिस्तानात ‘बच्चा बाजी’ बेकायदेशीर असूनही अजूनही ही अमानुष प्रथा सुरूच आहे. याला महत्वाचे कारण म्हणजे त्यात सहभागी असलेले अनेक लोक प्रभावशाली व श्रीमंत आहेत. ‘बच्चा बेरीश’ किंवा ‘दाढी नसलेला मुलगा’ बाळगणे हे या प्रौढ पुरुषांसाठी उच्च सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते.

  ही किशोरवयीन मुले फक्त मनोरंजन आणि लैंगिकतेसाठी ओळखली जातात. कारण विकत घेतल्यानंतर हे अय्याश अफगाणी श्रीमंत लोक मुलांचा आपल्या मर्जीनुसार तसेच ‘लैंगिक गुलाम’ म्हणून वापर करतात. पुढे आणखी वय वाढल्यानंतर साधारणपणे एकोणिसाव्या वर्षी मुलांना या कामासाठी नाकारण्यात येतं. त्यांना सोडून देण्यात येते. त्यामुळे समाजात पुन्हा स्वतःचं स्थान मिळवणं आणि अस्तित्व निर्माण करणं, या तरुणांना कठीण होऊन जातं