culaba fort

कुलाबा(kulaba) हा जलदुर्ग समुद्राच्या किनाऱ्यालगतच पण अलिबागमधील(alibag) किनाऱ्यापासून एक किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात आहे.

– सुभाष म्हात्रे

अलिबागमधील(alibag) कुलाबा किल्ला(kulaba fort) हा शिवकालीन जलदुर्ग आहे. भारतातील महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रदेशात मुंबई शहरापासून जलमार्गाने १३ मैल, तर रस्तेमार्गाने ११० किलोमीटर पश्चिमेस अलिबाग शहरात हा किल्ला आहे.

हा जलदुर्ग समुद्राच्या किनाऱ्यालगतच पण अलिबागमधील किनाऱ्यापासून एक किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात आहे. अलिबाग तालुक्याला ३० ते ३५ किलोमीटर लांबीची असलेली किनारपट्टी ही ‘अष्टागर’ या नावाने ओळखली जाते. या अष्टागराचा राजा म्हणजे ‘किल्ले कुलाबा’. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यापैकी एक ‘किल्ले कुलाबा’.

प्रथम शिवशाहीनंतर पेशवाई आणि सरते शेवटी इंग्रज असे कालखंड ‘किल्ले कुलाब्याने’ पाहिले. इंग्रज ज्यांना ‘समुद्रावरील शिवाजी’ असे संबोधत त्या सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला. मुंबईपासून रस्तेमार्गे ११० किलोमीटर आणि जलमार्गाने सुमारे १३ किलोमीटर अंतरावर वसलेले अलिबाग शहर आता सगळ्यांनाच परिचित आहे. या शहराला लागूनच असलेल्या पश्चिमेला भरसमुद्रात कुलाबा शिवकालीन किल्ला असून, सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या पराक्रमाचे केंद्रस्थान असलेला हा किल्ला कोणी बांधला आहे ज्ञात नसले, तरी उपलब्ध माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी १९६२ च्या सुमारास नव्याने हा किल्ला बांधला किंवा मजबूत केला अशी नोंद सापडते. अठराव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत या किल्ल्यास विशेष महत्व आले. सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या काळात तो जास्त ओळखला जाऊ लागला.

culaba 1

भरतीच्या वेळी जाणे घातक
समुद्राला येणाऱ्या भरतीच्या वेळी शक्यतो या किल्ल्यात पर्यटकांनी जाण्याचे धाडस करू नये. किल्ल्यात जायचे झाल्यास मच्छिमारांशी संपर्क साधून त्यांच्या मच्छिमार नौकांनी किंवा सध्या तेथे पर्यटकांसाठी असलेल्या बोटीने किल्ल्यात जाता येईल. हा किल्ला पाहण्यासाठी अलिबागला जलमार्गाने येण्यासाठी मुंबईतील गेटवे येथून अंजठा, पीएनपी लाँचने, तर करंजा येथून तरीने मोटार सायकलसह रेवस बंदर, तर भाऊचा धक्का येथून रो-रो सेवा बोटीने आपल्या वाहनांनी मांडवा येथे उतरून येता येते. तसेच ज्यांच्याकडे वाहने नसल्यास बंदरावरील खाजगी वाहनांनी अलिबागला येता येते. आपापल्या वाहनांनी रस्त्यामार्गे अलिबागला येता येत असून, ज्यांच्याकडे वाहने नसतील अशांनी एसटी बसने वडखळ, पोयनाड, कार्लेखिंड, सागाव, खंडाळे, गोंधळपाडामार्गे अलिबागला येता येते. अलिबागेत राहण्याची, चहानाश्ता, व्हेज-नॉनव्हेज खाण्याची सोय असून, अलिबागच्या समद्रकिनाऱ्यावरही जेवणाची सोय आहे.

kulaba fort view

किल्ल्यामध्ये काय ?
या किल्ल्यात श्रीसिद्धीविनायक देवतेबरोबरच श्रीशंकर, श्रीहनुमान, श्री भवानीमाता, श्रीपद्मावती देवी, कान्होबा आदी देवतांच्या मंदिरांसह मुस्लीम दर्गाही या किल्ल्यात आहे. गणपतीचे मंदीर १७५९ मध्ये राघोजी आंग्रे यांच्या काराकिर्दीत त्यांचे दिवाण गोविंदशेट रेवादास यांनी बांधले आणि त्यामध्ये श्रीसिद्धीविनायक देवतेची प्राणप्रतिष्ठा केली. या मंदिराचे बांधकाम हेमांडपंथी पद्धतीचे असून, त्याला दोन अंर्तगाभारे आहेत. पहिला गाभारा षष्टकोनी व आतला गाभारा अष्टकोनी आहे. या गाभाऱ्यात सात फूट लांब व चार फूट रुंदीच्या चबुतऱ्यावर हिंदू धर्मातील आद्य पाच देवतांच्या संगमरवरी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून त्या बसविल्या आहेत. दोन फूट उंचीची उजव्या सोंडेची श्री सिद्धीविनायक मूर्ती सर्व मूर्तींच्या मधोमध बसविलेली असून, त्याच्या डाव्या हातास पुढे श्रीविष्णुची मूर्ती व मागे अष्टभुजा देवीची मूर्ती आहे. श्रीसिद्धीविनायकाच्या उजव्या हातास पुढे श्रीशंकराची मूर्ती व मागे श्रीसूर्यदेवतेची मूर्ती आहे.

पूजा
देवस्थानातील मूर्तीच्या पुजाअर्चा करण्याचे काम अलिबागजवळील वेश्वी गावातील गुरव कुटुंबांकडे आंग्रेच्या काळात देण्यात आले. आजही गुरव कुटुंब आळीपाळीने किल्ल्यात राहून देवस्थानची व्यवस्था पहातात. श्रीसिद्धीविनायकाचे तेथील मंदीर किल्ल्यात असल्याने पूर्वी हे मंदीर गजबजत नसे; परंतू राज्याच्या कानाकोपऱ्यातून अलिबागमध्ये येणाऱ्या पर्यटकांसह भाविकांची संख्या वाढल्याने आणि किल्ला पाहण्याच्या निमित्ताने तेथे जाणाऱ्यांची वर्दळ वाढल्याने मंदिरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. पूर्वी या देवस्थानचा दरवर्षी साजरा होणारा माघी गणेशोत्सव काही भाविकांना माहित नसे. मात्र आता दरवर्षी माघी गणेशोत्सवावेळी पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत या मंदिरात गर्दी होत असते. यादिवशी या किल्ल्यात अलिबागकरांच्या वतीने भजन, किर्तनासह महाप्रसादाचा लाभ भाविकांना मिळत असतो. त्यासाठी अनेक दानशूर आपला आर्थिक मदतीचा हात पुढे करीत असतात. याशिवाय संकष्टी चतुर्थी, अंगारक चतुर्थीच्या वेळीही या मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. गणेशोत्सव काळातही प्रत्येकाच्या घरी गणपती असो किंवा नसो गणेशभक्त या मंदिरात हमखास सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी जात असतात. हा किल्ला समुद्र सपाटीस समतोल असून, अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरून पायी १५ मिनिटे चालत किंवा घोडागाडी करून जाता येते. हा संपूर्ण किल्ला दोन तासात आरामात फिरून बघता येतो.