रस्ता नसलेले गाव; ‘या’ सुंदर गावाला लाखों पर्यटक देतात भेट

या अद्भूत गावात कुठेच रस्ता दिसणार नाही. तिथे एकतर पायी चालत वा जलमार्गाने प्रवास होतो. त्यासाठी गावामध्ये सर्वत्र पाण्याने भरून वाहणारे विविध आकर्षक पाट आहेत.

सध्याच्या संगणकाच्या दुनियेत सगळीकडे सगळ्या सोयी असलेल्या दिसून येतात. या आधुनिक युगात पक्का रस्ता काही असे गाव कदाचित शोधूनही सापडणार नाही. ‘गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे वाहन’ याची प्रचिती येतेच. मात्र नेदरलँडमधील एक गाव यास अपवाद आहे. या अद्भूत गावात कुठेच रस्ता दिसणार नाही. तिथे एकतर पायी चालत वा जलमार्गाने प्रवास होतो. त्यासाठी गावामध्ये सर्वत्र पाण्याने भरून वाहणारे विविध आकर्षक पाट आहेत. हे पाट ओलांडण्यासाठी त्यांच्यावर कमानीच्या आकाराचे लाकडी पूल बांधलेले आहेत. कधीकधी या गावातील लोक प्रवासासाठी घोड्यांचीही मदत घेतात.

मात्र गावातील एकाही व्यक्तीकडे चुकूनही बाइक वा कार दिसत नाही. जी वाहने आहेत, ती सगळी गावाबाहेर. ओव्हरजस्सेल प्रांतातील गिएटहुर्न नावाच्या या अनोख्या गावामध्ये जवळपास साडेसहा किलोमीटर लांबीचे पाण्याचे कालवे असून त्यांच्या कडेला १८ व्या शतकाची ओळख करून देणारे कौलारू छतांचे फार्महाऊस दिसतात. आपल्या या आगळेपणामुळे हे गाव पर्यटकांच्याही पसंतीचे आवडीचे ठिकाण बनले आहे. दरवर्षी हजारो लोक गिएटहुर्नला भेट देऊन तिथल्या नौकाप्रवासाचा आनंद घेतात. अनोख्या वैशिष्ट्याचे हे गाव मध्ययुगीन कालखंडामध्ये म्हणजे १२३० च्या आसपास निर्वासितांच्या समुहाने वसविले होते. १९५८ मध्ये डच निर्मात्याने काढलेल्या फनफेअर चित्रपटात हे खेडे दाखविण्यात आले होते. तेव्हापासून खऱ्या अर्थाने त्याला जगभर ओळख मिळाली.