भटकंती करायची आहे?; मग मुंबापुरीच्या ‘या’ लेण्यांना नक्की भेट द्या

पाहणाऱ्याला थक्क करून सोडणारा शिल्पकलेचा एक उत्तम नमुना म्हणजे लेणी. प्राचीन आणि जागतिक कीर्तीचा वारसा लाभलेल्या लेण्यांनी महाराष्ट्र समृद्ध आहे. अप्रतिम शिल्प, सुबक कोरीवकाम आणि त्यातून मांडलेले देखणे चित्र या सर्वानी परिपूर्ण असलेल्या या लेण्यांची भेट म्हणजे एक निराळाच अनुभव! अशाच मुंबईशी जोडलेल्या पाच लेण्यांवर एक खास दृष्टिक्षेप!

लेणी म्हटले की अजिंठा आणि वेरूळ या दोन लेण्या प्रमुख्याने नमूद केल्या जातात. महाराष्ट्राला एकूण १८ लेण्यांचा वारसा लाभला आहे. ५ लेण्या मुंबईत आणि इतर मुंबईच्या जवळपास वसलेल्या आहेत. गंमत म्हणजे प्रसिद्ध एलिफंटा आणि कान्हेरी लेण्यांशिवाय अजून तीन लेण्या अंधेरी, जोगेश्वरी आणि बोरिवली या पश्चिम उपनगरामध्ये आहेत. याची माहिती फार कमी लोकांना आहे. म्हणूनच मुंबईशी जोडलेल्या ५ लेण्यांवर एक खास दृष्टिक्षेप!

एलिफंटा लेणी

मुंबईच्या पूर्वेला अरबी समुद्रात १० किमी अंतरावर एलिफंटा बेटावर वसलेल्या या लेण्यांना एलिफंटा लेणी किंवा घारापूरची लेणी असेही संबोधले जाते. वठएरउडने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या या आहेत. मोठय़ा विभागात पाच हिंदू लेण्या आहेत, ज्या महादेव शंकराला अर्पित केल्या आहेत. दुस-या विभागात दोन बौध लेण्या आहेत. या लेण्यांची निर्मिती ही तिसऱ्या ते पाचव्या शतकात केल्या गेल्याची नोंद आहे. या लेण्यांची निर्मिती हे एका बसॉल्ट खडकातून केली गेली आहे.

१५३४ पर्यंत या परिसराला घारापुरी असे म्हणत, पोर्तुगेस्सनी या लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ एक भव्य हत्तीचा पुतळा बघितला आणि या परिसराला एलिफंटा असे नाव दिले.  हाच हत्तीचा पुतळा आता जिजामाता उद्यानाच्या (राणीची बाग) परिसरात ठेवला आहे.

एलिफंटा लेण्यांमध्ये शंकर पार्वती यांच्या लग्नाचे शिल्प, रावणाने कैलास पर्वत हादरून टाकतानाचे शिल्प, अशी बरीचशी  पौराणिक शिल्पे येथे सुबकतेने कोरली आहेत.

महाकाली लेणी

मुंबईच्या अंधेरीसारख्या गजबजलेल्या भागात महाकाली लेणी वसलेली आहे, हे फार थोडय़ा लोकांना माहीत असेल. १९ लेण्यांचा समूह असलेली ही बौध लेणी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड आणि सीप्झजवळील एका टेकडीवर इतिहासाची साक्ष देत उभी आहे.

महाकाली लेण्या या दोन समूहात विभागल्या गेल्या आहेत. ४ लेण्या या वायव्येकडे (उत्तर-पश्चिम) असून १५ लेण्या दक्षिण पूर्व आहेत. बहुतांश लेण्या या विहार आहेत. ९ क्रमांकाची लेणी ही सर्वात मोठी असून ती चैत्य आहे. याच लेणीत बुध आणि बौध पुराणातील विविध आकृतींची ७ शिल्पे आढळतात. एका भव्य काळ्या बसॉल्ट खडकातून निर्माण केलेल्या या लेण्यांना आता अतिक्रमणाचा धोका जाणवतो.

जोगेश्वरी लेणी

मुंबईच्या जोगेश्वरी उपनगरात वसलेल्या फार प्राचीन हिंदू आणि बौध लेण्या जोगेश्वरी लेण्या नावाने ओळखल्या जातात. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळ वसलेल्या या लेण्यांना आता अतिक्रमणाचा सामना करावा लागत आहे. सांडपाणी, कचरा आणि वटवाघळे यांचे साम्राज्य आता या प्राचीन वास्तूवर पसरत आहे. कोरीव काम, प्राचीन शिवलिंग आणि द्वाररक्षकांचे पुतळे लक्ष वेधतात. लेण्यांमध्ये गणपती, मारुती, दत्त यांच्या मूर्ती आहेत आणि आजही त्यांची पूजा केली जाते. या लेण्यांमध्ये जोगेश्वरी (योगेश्वरी) देवीच्या पाऊलखुणा आणि मूर्ती आहे. याच देवीच्या नावावरून या उपनगराचे नाव जोगेश्वरी असे पडले.

ही लेणी जोगेश्वरी रेल्वे स्थानकापासून फक्त १ किमी अंतरावर आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरून या लेणीला भेट देता  येते. शहराच्या गर्दीत हरवून गेलेल्यांनी या लेणीला भेट देऊन पौराणिक इतिहासाला नक्कीच उजाळा द्यावा.

मंडपेश्वर लेणी

बोरिवलीच्या माउंट पोइन्सुर भागात असलेल्या या 8व्या शतकातल्या लेण्या शिवशंकराला अर्पित केल्या आहेत. या लेण्या संपूर्ण इतिहासाची साक्ष देतात. जागतिक महायुद्ध, पोर्तुगीजांची सत्ता आणि मराठय़ांचा उदय अशा प्रत्येक कालखंडात या लेणीचा वापर विविध कारणांसाठी केला गेला. मराठय़ांनी स्वारी करून हा संपूर्ण परिसर जाळून टाकला. त्या आगीत या परिसरातील घरे, चर्च जळून खाक झाली आणि वर्षानुवर्षे हा परिसर दुर्लक्षित राहिला. आता या लेण्यांना भारतीय पुरातत्व विभागाद्वारे संरक्षण प्राप्त झाले आहे. या लेण्यांमध्ये नटराज, सदाशिव, अर्धनारीश्वर, गणेश, ब्रह्म, विष्णू यांची शिल्पे आहेत. सुंदर लेण्या आणि त्यावर असलेले पुरातन चर्चचे अवशेष यांना जरूर भेट द्यावी.

कान्हेरी लेणी

मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात वसलेल्या कान्हेरी लेण्या हे पर्यटकांचे एक आवडीचे पर्यटनस्थळ आहे. एकाच दगडात कोरलेल्या १०९ बौध लेण्यांचा हा समूह भारतातील सर्वात मोठय़ा बौध धर्माची छाप असलेले स्थळ आहे.  बहुतांश लेण्यांचा वापर हा ‘विहार’ म्हणजेच राहण्यासाठी , अभ्यासासाठी, नामस्मरण करण्यासाठी केला जात असे. मोठय़ा लेण्या या ‘चैत्य’ आहेत. यांचा वापर सामुदायिक पूजेसाठी केला जात असे. लेण्यांमध्ये बुद्धाचे विविध शिल्प आढळून येतात, जास्त गर्दी हे लेणी क्रमांक ३मध्ये दिसून येते. या लेणीमध्ये एका स्तुपाची स्थापना केली आहे. लेण्यांवरून आजूबाजूचा परिसर खूप विलक्षणीय दिसतो. वर्षभर येते पर्यटकांची रेलचेल असते.