भारतातल्या या गावात कोट्याधीश आहे कुत्रे; आश्चर्यकारक आहे प्रकार

या गावात असलेली कुत्री जन्मतःच कोट्यधीश होतात. गावातील प्रत्येक कुत्रा अंदाजे 3 कोटींचा मालक आहे.

    अहमदाबाद,  गुजरातच्या मेहसाना जिल्ह्यात पांचोट नावाचे गाव कोट्यधीश कुत्र्यांचे गाव म्हणून देशभर प्रसिद्ध झाले आहे. या गावात असलेली कुत्री जन्मतःच कोट्यधीश होतात. गावातील प्रत्येक कुत्रा अंदाजे 3 कोटींचा मालक आहे. यामागची कथा मोठी मनोरंजक आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 80 वर्षांपूर्वी एका दानशूर माणसाने त्याच्या हातून काही पाप घडले असेल तर त्याचे परिमार्जन व्हावे म्हणून 21 एकर जमीन कुत्र्यांना खाऊ घालण्याच्या खर्चासाठी दान दिली. ही दान परंपरा अजूनही पाळली गेली आहे. ही जमीन दरवर्षी लिलाव करून जो जास्त बोली लावेल त्याला कसायला दिली जाते. यातून मिळणाऱ्या पैशातून कुत्र्यांना सांभाळले जाते.

    त्यासाठी मध नी पती कुतरिया ही संस्था स्थापन केली गेली आहे. या जमिनीजवळून लवकरच बायपास रोड तयार होत आहे आणि एक भव्य मॉल बांधला जाणार आहे. त्यामुळे या जमिनीची किंमत कोट्यवधी रुपये झाली आहे. जमीन कुत्र्यांना दान दिली असल्याने ती विकता येत नाही.

    त्यामुळे जमीन कसून अथवा नापीक जमिनीवर बांधल्या गेलेल्या बिल्डिंग, दुकानांची भाडी गोळा केली जातात. हा सर्व पैसा कुत्र्यांवर खर्च होतो. नरेशभाई पटेल सांगतात त्यांनी जमीन विकणार नाही अशी शपथ घेतली आहे. त्यामुळे या गावात जन्मणारी कुत्री या जमिनीची मालक आहेत. सध्या या जमिनीचा दर प्रती एकर साडेतीन कोटी रुपये आहे.