बलात्काऱ्यांना नपुसंक करण्य़ाचा कायदा संसदेत मंजूर; पाकिस्तानने उचलले मोठे पाऊल

इम्रान खान यांनी गेल्यावर्षी पहिल्यांदा सिरियल बलात्कारी व्यक्तींना नपुसंक करण्याचा विचार मांडला होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, मूळ पाकिस्तानच्या असलेल्या फ्रेंच महिलेवर, तिच्या मुलांसमोर दोघा नराधमांनी बलात्कार केला.

    इस्लामाबाद, पाकिस्तानच्या संसदेने बलात्कार प्रकरणात नवीन आणि कठोर कायद्याला मंजुरी देण्यात आली आहे. या कायद्यानुसार, सिरियल बलात्कारी आरोपींना औषधांच्या मदतीने नपुसंक करण्याची शिक्षा आता देण्यात येणार आहे. एका वर्षापूर्वी या कायद्याचा अध्यादेश इम्रान सरकारने आणला होता. या अध्यादेशात इतर काही बाबींचा समावेश करुन विधेयक मांडण्यात आले, ते संसदेत पास झाले. दुसरीकडे पाकिस्तानातील कट्टरपंथियांनी या कायद्याला विरोध केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा कायदा, मुसलमानांच्या शरिया कायदा आणि इस्लामच्या विरोधात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

    कायद्यातील महत्त्वाच्या बाबी
    ज्यांना दुष्कृत्य करण्याची सातत्याने सवय आहे, त्यांच्याविरोधातच या शिक्षेचा वापर करता येणार आहे. लैंगिक शोषणाच्या प्रकरणात वारंवार सापडलेल्या आरोपींना ही शिक्षा देण्यात येणार आहे. अशा आरोपींविरोधात खटला चालेल, चार महिन्यात या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यात येणार आहे. यानंतर न्यायालय केमिक प्रोसेस अंतर्गत औषधे देऊन या आरोपींना नपुसंक करण्याची शिक्षा देईल.

    तपास यंत्रणा काय करणार
    लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांकडे यापुढे तपास यंत्रणा अधिक लक्ष देणार आहेत. या प्राकाराचे अपराध करणाऱ्या आरोपींचा देशपातळीवर एक डेटा तयार करण्यात येणार आहे. ज्यावेळी या प्रकरणांची सुनावणी कोर्टात होईल, तेव्हा कोर्टात त्या आरोपीचा क्रिमिनल रेकॉर्ड कोर्टासमोर सादर करण्यात येणार आहे. या प्रकरणाची सुनावणी चार महिन्यात तयार करण्यात येणार असून, त्यासाठी स्पेशल कोर्ट उभारण्यात येणार आहेत. लैंगिक शोषणाच्या शिक्षेला पाकिस्तानात जन्मठेप आणि फाशी सारख्या शिक्षा आहेत, मात्र तरीही लैंगिक शोषणाचे प्रकार थांबत नसल्याने हा नवा कायदा मंजूर करण्यात आला आहे. लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार पाकिस्तानात सातत्याने वाढत आहेत.

    एका प्रकरणाने सगळे बदलले
    इम्रान खान यांनी गेल्यावर्षी पहिल्यांदा सिरियल बलात्कारी व्यक्तींना नपुसंक करण्याचा विचार मांडला होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, मूळ पाकिस्तानच्या असलेल्या फ्रेंच महिलेवर, तिच्या मुलांसमोर दोघा नराधमांनी बलात्कार केला. त्यानंतर अशा आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीला जोर आला. या प्रकरणात दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सानवण्यात आली आहे.