गजानन महाराज अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थ्यांना 10 लाखांचे पॅकेज

-नामांकित कंपनीमध्ये ऑनलाईन निवड

शेगाव,

येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन  विद्यार्थ्यांची बायजूज् या नामांकित एज्युकेशनल टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये ऑनलाईन कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झाली आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांना तब्बल 10 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळणार आहे.

 
अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. विनय थुटे यांनी ही माहिती दिली. या कंपनीतर्फे पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंटचे ऑनलाईन आयोजन 8 जूनला करण्यात आले होते. त्यातून दोन विद्यार्थ्यांची निवड झाली. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा रोहन डांगे व मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधून धनराज धनोकार या विद्यार्थ्यांची बिझनेस डेव्हलपमेंट ट्रेनी म्हणून  निवड झाली. या दोघांना दहा लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातर्फे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने कंपन्यांना अपेक्षित संवाद, तांत्रिक, तार्किक, बुद्धिमत्ता क्षमता, बॉडी लँग्वेज, टीम वर्क, सर्जनशीलता, व्यवस्थापन या सारखी कौशल्ये रुजविण्यासाठी प्रशिक्षण, कार्यशाळा, सेमिनारचे आयोजन वर्षभर सुरू असते.