दारूसाठ्यासह 5 लाखाचा मुद्देमाल जप्त

दोन आरोपींना अटकेत

वरोरा,

चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील खांबाडा परिसरातून एका वाहनाने दारूसाठा येत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे डॉ. उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात सोमवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास अवैध दारू विक्रेत्यास अटक करून 5 लाखाचा माल जप्त करण्यात आला.

गुप्त माहितीच्या आधारावर पोलिस हवालदार मधुकर आत्राम, नापोशी प्रदीप पाटील, एएसआय भास्कर कुंदावार, शिपाई जावेद सिद्दीकी यांनी सापळा लावून संशयित वाहनांची तपासणी करणे सुरू केले. दरम्यान सेंट्रो कार क्रमांक एम एच 31 सी आर 2157 मध्ये देशी दारूच्या 90 मिलीने भरलेल्या 2 हजार बॉटल खड्याच्या 20 विविध खोक्यांमध्ये आढळून आल्या. सदर दारूसाठा आणि वाहन व एक भ्रमणध्वनी असा 5 लाख एक हजाराचा मुद्देमाल जप्त करून आरोपी वाहन चालक निरू यादव व त्याचा सहकारी मंगलदेव यादव दोन्ही रा. टेमुर्डा यांना दारूबंदी कायदा तसेच इतर अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. हा दारूसाठा कोणी पुरविला व जिल्हा सीमा ओलांडून कसा आला याचा शोध पोलिस घेत आहे.