5 वीज कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह

 हिंगणघाट, पुलगाव व विजयगोपाल येथे उपाययोजना सुरू
 तीन दिवसात आढळले 10 कोरोनाबाधित

 हिंगणघाट/ पुलगाव,

जिल्ह्यात कोरोना आजाराचे संक्रमण वेगाने पसरत आहे. गेल्या तीन दिवसांत कोरोना आजाराचे दहा रुग्ण आढळून आले आहे. रविवार, 5 जुलै रोजी पुन्हा पाच  वीज कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली. यामध्ये हिंगणघाटचे तीन, पुलगाव व विजयगोपाल येथील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. प्रशासनाने या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले आहे. रायगड येथून परत आल्यानंतर एकूण 8 वीज कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

 वीज विभागाचे कर्मचारी कोकण विभागातून परत आल्यावर महावितरणचे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वाहनाने उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे संस्थात्मक विलगीकरण करण्याविषयी घेऊन गेले होते. येथील डॉक्टरांनी त्यांना संस्थात्मक विलगीकरण न करता गृह विलगीकरणात ठेवले होते.

कोकणात चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागातील वीज वितरण विभागाची दुरुस्तीची कामे करण्यासाठी 20 कर्मचारी वर्धा जिल्ह्यातून 16 जूनला गेले होते. परतल्यानंतर यातील 3 कर्मचारी शनिवारी कोरोना बाधित निघाल्यावर उर्वरित कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील रविवारी प्राप्त अहवालात  शहरातील 3 व्यक्ती कोरोनाबाधित निघाल्या आहेत तर 2 अहवाल संशयित आहेत. तसेच हे कर्मचारी कोरोनाचे बाधित निघाल्याने अन्य कर्मचारी वर्गाचा शोधार्थ महावितरणचे उपविभागीय कार्यकारी अभियंता हेमंत पावडे यांनी व्हॉटसअॅपवर कर्मचाऱ्यांचे फोटो पाठवून शोध मोहीम घेण्यात आली. तेव्हा यामधील एक कर्मचारी हा हिंगणघाटपासून वणी ते सिरुड मार्गावरील एका शेतातील झोपडीमध्ये रात्री एक ते दीड वाजताचे सुमारास आढळून आला. अन्य कर्मचारी त्याला सोबत घेऊन आले व विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले. यामध्ये 3 बाधित कर्मचाऱ्यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी  डॉ. माधुरी कुचेवार (दिघे) यांनी दिली.

या रुग्णासहित जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 27 झाली असून त्यातील 12 कोरोनामुक्त तर 14 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. एकाचा पूर्वीच मृत्यू झाला आहे. हिंगणघाट येथील या घटनेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संत तुकडोजी वॉर्डातील काही भाग सील करण्यात आला.  परिस्थितिवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसीलदार श्रीराम मुंदड़ा, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. चाचरकर,  उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे, निरीक्षक सत्यवीर बंडीवार, मुख्याधिकारी अनिल जगताप, नगराध्यक्ष प्रेम बसंतानी व अधिकारी लक्ष ठेवून आहे.

देवळी तालुक्यात महावितरण कंपनीचे दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

यात पुलगाव येथील हरिराम नगर व विजयगोपाल येथील विठ्ठलनगर येथील  रहिवाशी आहे.

यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. पुलगावातील हरिरामनगर भाग व विजयगोपाल येथील विठ्ठलनगर भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. दोन दिवसाकरिता विजयगोपाल बंद ठेवण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बागडे यांनी दिले. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या हायरिक्समधील पुलगाव येथील चार तर विजयगोपाल येथील नऊ लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. बाकी लोकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिंगणघाटमध्ये दोन दिवस जनता कर्फ्यू

शहरात एकाच दिवशी तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने उपविभागीय अधिकारी  चंद्रभान खंडाईत यांनी  रविवारी मंगळवारी सायंकाळी 5 वाजतापासून मंगहवारी रात्री 12 वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. केवळ आरोग्याशी संबंधित  व औषध विक्रीची दुकाने सुरू राहणार आहे. औद्योगिक कंपन्या, कृषी सेवा  केंद्र  व अन्य  प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन चंद्रभान खंडाईत यांनी केले आहे.

एसडीओने केली पाहणी

 वर्धेचे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी पुलगाव व   विजयगोपाल गावाची पाहणी केली. त्यांनी नागरिकांना सावध राहत शासकीय नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी तहसीलदार राजेश सरवदे, उपविभागीय पोलिस अधिकारी तृप्ती जाधव, ठाणेदार रवींद्र गायकवाड, मुख्याधिकारी प्रशांत उरकडे, डॉ.  आकरे उपस्थित होते.