महाज्योतीला ५०० कोटीचा निधी मिळवून देणार : पालकमंत्री

गडचिरोली,

इमाव, विजाभज व विमाप्र युवक-युवतींच्या प्रशिक्षणासाठी ‘महाज्योती’ नावाने स्थापन झालेली स्वायत्त संस्था लवकरात लवकर कार्यान्वित करून या संस्थेच्या अंमलबजावणीसाठी ५०० कोटीचा निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन इतर मागासवर्ग, बहुजन विकास, मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले.

 पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार जिल्हा दौ-यावर आले असता, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिका-यांनी त्यांची भेट घेवून चर्चा केली तसेच विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी ते बोलत होते. शिष्टमंडळाशी बोलताना ना. वडेट्टीवार म्हणाले, महाज्योतीचे कार्यालय नागपूर येथे सुरू होणार आहे. या संस्थेसाठी व्यवस्थापकीय संचालक यांची नियुक्ती झाली असून इतर तीन अशासकीय संचालकांच्या नियुक्त्या लवकरच केल्या जाणार आहे. ‘बार्टी’ व ‘सारथी’साठी राबविण्यात येणा-या सर्व योजना ‘महाज्योती’ या संस्थेमार्फत विमाव, विजाभज व विमाप्र युवक-युवतींसाठी राबवल्या जाणार आहेत. त्यासाठी ५०० कोटीचा निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.

त्याचप्रमाणे ओबीसी व बहुजन कल्याण मंत्रालयामार्फत राज्यातील ओबीसी प्रवर्गाला त्यांच्या संख्येनुसार घरकुल योजना तसेच अनुसूचित जाती व जमातींच्या शेतक-यांना व बेरोजगारांना ज्या योजना लागू आहेत त्या सर्व योजना विमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील शेतक-यांना व बेरोजगारांना सुद्धा लागू करण्यात येतील, राज्यातील गडचिरोली जिल्ह्यासह ओबीसींचे कमी झालेले आरक्षण लवकरच पूर्ववत १९ टक्के केले जाणार असून, ओबीसी जनगणनेचा प्रश्नसुद्धा निकालात काढण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक हालचाली सुरू असल्याचे त्यांनी यावेळी शिष्टमंडळाला सांगितले.

शिष्टमंडळात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, सचिव प्रा. देवानंद कामडी, सुरेश भांडेकर, प्रा. प्रकाश सोनवणे, जगदीश मस्के, अरुण पाटील मुनघाटे, भाऊराव पत्रे, रवींद्र समर्थ उपस्थित होते.