अल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर

अकोट,

येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी दोन पॉस्को खटल्यामधील आरोपी कैलास रामा डावर रा. वसाली ता. संग्रामपूर व सागर दीपक लबडे रा. देशमुखप्लॉट अकोला यांचा कोविड-19 चे कारण पुढे करुन केलेला जमानत अर्ज नामंजूर केला.  

 अकोला जिल्हा कारागृहात कोरोनाचे रुग्ण असल्याने जामीन अर्ज केला होता. आरोपी कैलास डावर याने सात वर्षीय व आरोपी सागर याने 12 वर्षीय अल्पवयीन पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप असून दोन्ही आरोपी अकोला कारागृहात आहेत.

अकोला कारागृहात कोविड-19 चे 68 कैदी आहेत हे कारण पुढे करुन जमानतीसाठी अर्ज केला होता. या प्रकरणात सरकारी वकील अजित देशमुख यांनी दोन्ही प्रकरणात लेखी उत्तर कोर्टात दाखल केले व युक्तिवाद केला की, दोन्ही प्रकरणे गंभीर स्वरूपाची आहेत. यामध्ये वैद्यकीय व इतर पुरावे देखील आरोपीचे विरुद्ध नोंदविले गेले आहेत. तसेच गंभीर प्रकरणात जमानत मिळवण्याचे कारण नाही. कारागृह प्रशासन कोविड  संक्रमित बंदीवानांची काळजी घेत आहे. लॉकडाऊनमुळे खटला चालवल्यास विलंब होत आहे, या आरोपींच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. यांना जमावतीवर सोडले तर दोन्ही अल्पवयीन मुलींचे मानसिक स्थितीवर विपरीत परिणाम होईल व साक्षीदारांच्या जीवाला धोका निर्माण होईल. दोन्ही पक्षाचे युक्तिवादानंतर कोर्टाने दोघांचा जमानत अर्ज नामंजूर केला.