महिला वकिलाला ॲसीड हल्ल्याची धमकी

समाजमाध्यमांवर केली बदनामी

नागपूर,

महिला वकिलाला भर रस्त्यात अडवून ॲसिड हल्लाची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही  घटना सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास अजनी भागात घडली. पीडित  महिला वकिलाच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी विनयभंगासह विविध कलामन्वये गुन्हा दाखल केला आहे. सिद्धांत पाटील (वय २५) रा. शताब्दीनगर, अनिकेत कुत्तरमारे (वय २८) रा. जोशीवाडी व त्यांचा साथीदार, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धांत व अनिकेत एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत.

पीडित महिला वकिलाची सामाजिक संस्था आहे. लॉकडाऊनदरम्यान भोजन वितरणादरम्यान तिची सिद्धांत व अनिकेतसोबत ओळख झाली. याचदरम्यान वकिलाने स्वयंसेवकांसाठी घरी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. सिद्धांतही तेथे आला. जेवणावरून त्याने महिला वकिलासोबत वाद घातला. सिद्धांत याने अनिकेत यालाही बोलाविले. त्यानेही महिला वकिलासोबत वाद घातला. अन्य स्वयंसेवकांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला. त्यानंतर दोघेही महिला वकिलाचा पाठलाग करायला लागले. तिची छेड काढायला लागले. सोमवारी महिला वकील पायी जात होती. सिद्धांत , अनिकेत व त्याच्या साथीदाराने वकिलाला अडविले. तिचा हात पकडला. ॲसिड हल्ला करून ठार मारण्याची धमकी दिली व पसार झाले. यानंतर महिला वकिलाने अजनी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.