पेट्रोल दिले नाही म्हणून  पेट्रोलपंपात सोडले विषारी साप

बुलडाणा,

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 21 जुलैपर्यंत सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु या काळात पेट्रोल न दिल्याने रागाच्या भरात अज्ञात सर्पमित्राने बुलडाण्यातील चौधरी पेट्रोलपंप मालकाच्या कार्यालयात व अन्य दोन ठिकाणी दोन कोब्रा जातीचे व एक धामण असे तीन साप सोडल्याची धक्कादायक घटना सोमवारी 13 जुलै रोजी घडली.

बुलडाणा शहरातील मलकापूर रोडवर असलेल्या चौधरी पेट्रोल पंपावर लॉकडाऊन काळात दुपारी चारच्या सुमारास दुचाकीने आलेल्या दोन युवकांनी बाटलीत पेट्रोल देण्याची मागणी केली. नियमाने बाटलीत पेट्रोल देता येत नाही आणि दुपारी 3 नंतर लॉकडाउन असल्याने पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्याला पेट्रोल देण्यास नकार दिला. दोन युवकामधील एका सर्पमित्राने त्याच्याकडे बरणीत असलेले तीन साप रागाच्या भरात पंप मालकाच्या केबीनमध्ये, कर्मचाऱ्यांच्या व कॅश रुममध्ये प्रत्येकी एक-एक साप सोडून दिले. सापामध्ये दोन विषारी जातीचे कोब्रा आणि एक धामण जातीचा असे तीन साप होते. दरम्यान पेट्रोलपंप मालक सारिका चौधरी, कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या सर्पमित्रांना याची माहिती दिली. यावरून सर्पमित्र श्रीराम रसाळ यांच्या चमूने सोडलेल्या तिन्ही सापाचे रेस्क्यू करून त्यांना बरणीत कैद केले. यामुळे मोठी दुर्घटना होता होता टळली. घटनेचे दृश्य पंपावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

सर्पमित्र संघटनेचा निषेध

या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून सदर युवकांचा पोलिस शोध घेत आहेत. झालेल्या धक्कादायक घटनेचा सर्पमित्रांच्या जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी निषेध व्यक्त करीत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.