पॉझिटिव्ह रूग्णांची दवाखान्यात  जाण्यास टाळाटाळ, गुन्हा दाखल

अकोला,

कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जे रुग्ण उपचाराकरिता दवाखान्यात जाण्यासाठी टाळाटाळ करतात किंवा दवाखान्यात भरती न होता नातेवाईकांकडे किंवा इतरत्र निघून जातात अशा व्यक्तींवर आता कारवाई होणार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या जवळच्या संपर्कात असणारे त्यांचे नातेवाईक तसेच मित्र व शेजारी यांना क्वारंटाइन सेंटरला इलाजासाठी जाणे अत्यावश्यक आहे, परंतु यासंदर्भातही काही नागरिक टाळाटाळ करतात. त्याअनुषंगाने उपचार घेण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या व क्वारंटाइन सेंटरला न जाणाऱ्या नागरिकांच्या विरोधात फौजदारी कारवाई करणे सुरू झाले असून, याच संदर्भात खदान पोलिस स्टेशनमध्ये कच्ची खोली, सिंधी कॅम्प येथील रहिवासी असणाऱ्या 36 वर्षीय पुरुष रुग्णावर तसेच खदान येथे राहणाऱ्या एका स्त्री रुग्णाविरुद्ध, भादंविच्या कलम 269, 271, 188 आणि सहकलम 3 साथरोग अधिनियम, सहकलम 51 बी आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दवाखान्यात जाण्यास अशाप्रकारे टाळाटाळ करणाऱ्या पॉझिटिव्ह नागरिकांविरुद्ध यापुढेही गुन्हे नोंद करण्यात येणार आहेत.