अनैतिक संबंधातून पत्नीची निर्घृण हत्या

  • धारणीतील राणीगाव जंगलात घटना
  • नेपानगर पोलिस स्थानकात पतीचे आत्मसमर्पण

धारणी. तालुक्यातील अतिदुर्गम अशा ४८ किमी अंतरावरील राणीगाव लगतच्या जंगलात पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना रविवारी घडली. रिना भीमसिंग मंडलई (३२) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार भीमसिंग प्यारसिंग मंडलई (३६, रा. माझगाव, नेपानगर, जिल्हा बुरहानपूर, मध्यप्रदेश) याने पत्नीला राणीगावातील जंगलात नेले. तिथे तिचे हातपाय बांधून गळा दाबून हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी भीमसिंगने नेपानगर पोलिस स्थानकात जाऊन आत्मसमर्पण केले. त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली असता ही घटना पुढे आली.

अनैतिक संबंधातून हत्या
पत्नीचे अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपी पतीने पत्नीला संपविण्याचा कट रचला. पत्नी माहेरी राणीगाव येथे गेल्यानंतर भीमसिंग तिला भेटायला गेला आणि जंगलात नेऊन तिची हत्या केली. या घटनेत पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. धारणी पोलिस उपविभागीय अधिकारी संजय काळे, पोलिस निरीक्षक एल. के. मोहंदुळे, पीएसआय चापले, महल्ले, अनिल झारेकर, सचिन होले, अनुराग पाल, योगेश राखुंडे, अरविंद सरोदे यांनी राणीगाव जंगलात मृतदेह शोधून शवविच्छेदनाकरीता धारणीतील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी आरोपी  भीमसिंगला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.