पिकांवर शंखीय गोगलगाईंचे आक्रमण

  • शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

तळेगांव. निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडलेल्या अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या  शेतकऱ्यांवर नेहमीच संकटे उभी असतात. कधी कोरडा दुष्काळ, तर कधी ओला नाहीतर अतिवृष्टीने नुकसान यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. अशातच यावर्षी आता फळवर्गीय उत्पादनासह भाजी, तुर, कापूस, सोयाबीन पिकांसह  संत्रा झाडे व इतरही पिकांवर मोठ्या प्रमाणात शंखीय गोगलगायी आढळून आल्याने शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट येऊन उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

 भाजीपाला, सोयाबीन, तुर, कपाशी, संत्रा तसेच इतर फळ पिकांसह इतर झाडांवर आक्रमण केले असून पिकांची पाने खाऊन पालवी फुटलेली कोवळी पिके फस्त करीत आहे. त्यावर नियंत्रण घालणे कठीण असून कीटकनाशक फवारणी करूनही काही उपयोग होत नाही. असे शेतकरी सांगतात. मागील दोन ते तीन वर्षांपासून नदी, नाल्यांच्या लगतच्या शेतात शंखीय गोगलगाय दिसत होत्या. मात्र यावर्षी गोगलगायींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून नदी, नाल्यांच्या लगतच्या शेतातही गोगलगायींचे  अस्तित्व दिसून येत आहे. त्यांचा आकार १५ ते २० सें.मी.पर्यंत आहे.या शंखीय गोगलगायी रात्रीला शेतातील पिकांवर आक्रमण करतात तर दिवसा ढगाळी वातवरणात तुर, कपासी पिकांच्या शेंड्यावर, झाडांवर शेताच्या सभोवताल असलेल्या कुपाट्यावर दिसतात, तर उन्ह तापल्यास पिकांच्या व झाडांच्या बुडाशी  मातीत लपून बसतात. या शंखीय गोगलगायींचा वेळीच नायनाट होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने याकडे लक्ष देत उपाययोजना करण्याची  मागणी शेतकरी करीत आहे.

तालुका कृषी अधिकारी एस.एन. नडगिरी यांना उपायाबाबत विचारले असता ते म्हणाले की,   पिकांवर गोगलगायींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास हमला  किटकनाशकाची फवारणी करावी .  जमिनीवर प्रादुर्भाव दिसून आल्यास शेताचे  बांध स्वच्छ करून बांधालगत तंबाखूचा भुसा किंवा चुना टाकावा.शेतात ठिकठिकाणी कचरा गोळा करून त्यावर गुळाचे पाणी टाकावे व ओले पोते झाकावे्र गोगलगाय गुळाच्या वासाने पोत्याखाली आल्यावर गोळा करून त्यांना मारून टाका.