नवोदयसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करुन भरणार शाळा : आ. होळी

चामोर्शी,

शासनाच्या परिपत्रकानुसार शाळा व्यवस्थापन समिती व पालकांच्या संमतीने 2 जुलैपासून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत शाळा सुरु करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोरोनाबाबत विशेष दक्षता बाळगित शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. याकरिता शाळेला भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन आ. डॉ. देवराव होळी यांनी दिले.

शंभर वर्षे पूर्ण करणा-या चामोर्शी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेला आ. डॉ. देवराव होळी यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे, शिक्षण विस्तार अधिकारी अलोणे, स्वीय सहाय्यक रमेश अधिकारी, केंद्रप्रमुख हिम्मतराव आभारे, मुख्याध्यापक प्रभाकर दुधबळे, शाव्य समितीचे अध्यक्ष ओमदास झरकर, उपाध्यक्षा किशोरी मोते, सदस्य आशीष पिपरे, तुकाराम बोधलकर, शाळेतील शिक्षक तुषार चांदेकर, मंगलकुमार मानमपल्लीवार, प्रभाकर दूधबळे, नम्रता मार्तीवार, निर्मला कोंडवार, पुष्पलता कोंडावार, वंदना रामटेके, शालू कोडापे उपस्थित होते.

     याप्रसंगी नवोदय विद्यालय घोटसाठी निवड झालेल्या आर्यन गेडाम, साई कार्लेवर, साहिल चलाख, साहिष्मां चिटलोजवार यांचेसह वर्गशिक्षक प्रविण पोटवार आ. डॉ. होळी, शिक्षणाधिकारी मुनघाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आ. होळी यांनी शाळेची पाहणी केली. कोरोणाच्या जागतिक महामारीमुळे विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान झाले असून हे नुकसान टाळण्यासाठी पालकांच्या संमतीने कोरोना विषयीचे नियम पाळून, शारीरिक अंतर राखून, मास्क, स्वच्छता, निर्जंतुकीकरण करून शाळा सुरू करता येतील, असे त्यांनी सांगितले. शाळेच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त करून शाळेला भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदारांनी दिले. शिक्षणाधिकारी मुनघाटे यांनी शाळेतील उपलब्ध जागा, खोल्या, भौतिक सुविधा याचा विचार करून सुरक्षित अंतर राखून शाळा सुरू करण्याविषयी मार्गदर्शन केले. शिक्षक व पालक यांच्या जबाबदा-या कोणत्या याविषयी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आशिष पिपरे यांनी जिप केंद्र शाळा ही तालुक्यातील सर्वात मोठी पटसंख्या असलेली शाळा असून शाळेसाठी जादा वर्गखोली व शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली. कार्यक्रमाचे संचालन नम्रता मार्तीवार तर आभार प्रविण पोटवार यांनी मानले.