बीएसएनएल कर्मचा-यांच्या संपामुळे ग्राहकांना मनस्ताप

 इंटरनेटची समस्या सोडविण्यास असमर्थता

गडचिरोली,

भारत संचार निगम लिमीटेडच्या कंत्राटी कर्मचा-यांनी 11 महिन्यांचे मानधन थकीत असल्यामुळे 9 जुलैपासून संप पुकारला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बीएसएनएल ग्राहकांच्या विविध अडचणी सोडविणे कठीण झाले असून ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कर्मचा-यांच्या बेमुदत संपामुळे शासकीय व खाजगी कार्यालयातील विविध कामे प्रलंबित आहेत.

गडचिरोली जिल्हाभरात बीएसएनएलची सेवा कार्यान्वित आहे. संबंधित विभागाकडून कंत्राटी कर्मचा-यांच्या माध्यमातून सेवा पुरविली जात आहे. मात्र कंत्राटी कर्मचा-यांनी थकीत मानधन मिळण्यासाठी संप पुकारल्यामुळे विस्कळीत झालेली सेवा पूर्ववत करण्यास विविध अडचणी येत आहेत. विविध खाजगी तसेच शासकीय कार्यालयातील खंडीत झालेली इंटरनेट सेवा सुरळीत करण्यास बीएसएनएल असमर्थ ठरत आहे. मुख्य कार्यालयात अनेक तक्रारी प्राप्त होत असताना कर्मचा-यांअभावी मुख्य कार्यालयही समस्या सोडविण्यास असमर्थ ठरत आहे. परिणामी ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून बीएसएनएलच्या कारभाराप्रती रोष व्यक्त केला जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन व्यवहार वाढले असल्याने इंटरनेटची अत्यंत आवश्यकता आहे. तसेच उद्याचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा ऑनलाईन अभ्यासक्रम दिला जात आहे. मात्र यासाठी खंडीत इंटरनेटची सुविधा अडथळा ठरत आहे. बीएसएनएल कंत्राटी कर्मचा-यांनी संप पुकारल्याने तक्रार करुनही खंडीत इंटरनेट सेवा सुरळीत करण्यास कुणीही कर्मचारी फिरकत नसल्याने खाजगी तसेच शासकीय कार्यालयातील कामकाजावर मोठा परिणाम पडत आहे. शेतकरी, मजूर व इतर बीएसएनएल ग्राहक आपल्या मोबाईलमध्ये महागडे रिचार्ज करतात. मात्र बीएसएनएलची इंटरनेट सेवा वारंवार खंडीत राहत असल्याने मोबाईलधारकांनाही रिचार्ज करणे न परवडणारे ठरत आहे. शहरासह दुर्गम भागात बीएसएनएलचे टुजी, थ्रीजी, फोरजीचे टॉवर उभारण्यात आले आहेत. मात्र इंटरनेटची स्पीड अत्यंत कमी राहत असल्याने मोबाईलधारकांना खाजगी कंपनीचा आधार घ्यावा लागत आहे.

शेतीकामातही इंटरनेटचा खोडा

सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. यासाठी शेतकरी विविध बॅंकांतून कर्ज घेत असतो. तसेच कर्जमाफीची प्रक्रिया सुद्धा ऑनलाईन सुरु आहे. यासाठी शेतक-यांना शेतीकामे सोडून ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी तालुका तसेच शहराच्या ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे. अनेक सेतू केंद्र तसेच ऑनलाईन कॅफेमध्ये बीएसएनएलची इंटरनेट सेवा आहे. मात्र ही सेवा सुरळीत नसल्याने अनेक शेतक-यांना तासन‍्तास ताटकळत राहावे लागत आहे. कधीकधी दिवसभर इंटरनेट सेवा ठप्प राहत असल्याने शेतक-यांना दुस-या दिवशीही शेतीचे काम सोडून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जावे लागत आहे. यामुळे शेतक-यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.