कोरोनाची ग्रामीण भागावर घट्ट पकड

– आणखी 25 पॉझिटिव्ह रूग्णांची भर

– पॉझिटिव्ह रूग्ण 1800 च्या पार

अकोला,

जिल्हयात आता कोरोनाने ग्रामीण भागात घटट पाय रोवले आहेत. गुरूवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयाकडून प्राप्त 250 अहवालांमध्ये 25 जण पॉझिटिव्ह आढळले असून, त्यातील बहुतांशी ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे जिल्हयात कोरोनाचे रूग्ण सर्वदूर पसरल्याचे स्पष्ट झाले आहे.

गुरुवारी प्राप्त अहवालांमध्ये 225 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी आता जिल्हयातील कोरोनाबाधितांची संख्या 1822 झाली आहे. गुरूवारी पॉझिटिव्ह आलेल्या 25 जणांमध्ये सहा महिला व 19 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील सहा जण अकोट येथील, पाच जण बाळापूर येथील, तीन जण महान येथील, तीन जण खोलेश्वर येथील, दोन जण चांदूर येथील तर उर्वरीत हिंगणा पारस, रजपूतपूरा, मलकापूर (अकोला), कोठारी वाटिका मलकापूर रोड, खडकी व शिवनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. यापैकी तब्बल 19 जण हे ग्रामीण भागातील आहेत. अकोला शहरामध्ये लॉकडाऊन शिथील होण्यापूर्वी ग्रामीण भागात त्यामध्ये गेल्या महिन्यातच सूट देण्यात आली होती. सर्व प्रकारचे दुकाने उघडल्याने आणि त्याठिकाणी सोशल डिस्टन्सींग, मास्कचा वापर या महत्वाच्या बाबींना फाटा देण्यात आल्यामुळे आता पंधरा दिवसांनंतर ग्रामीण नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागताच त्यांनी शासकीय रूग्णालयाकडे धाव घेतली. शहरानंतर आता हळूहळू संपूर्ण ग्रामीण भागच कोरोनाच्या विळख्यात सापडत चालल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागासाठी ही चिंतेची बाब ठरली आहे.  गुरूवारी अकोट, बाळापूर आणि बार्शीटाकळी तालुक्यातील कोरोनाबाधित समोर आले तर पातूर, मूर्तिजापूर, तेल्हारा या तालुक्यांमधील बरेचसे कोरोनाबाधित रूग्ण उपचारानंतर बरे होवून घरी गेले आहेत, काही अलगीकरणात तर काही विलगीकरणात आहेत. गुरूवारी प्राप्त आकडेवारीनुसार, जिल्हयात एकूण पॉझिटिव्ह अहवालांची संख्या 1801 आणि रॅपीड टेस्टमधून पॉझिटिव्ह आलेले 21 असे एकूण 1822 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. त्यामध्ये एकाने आत्महत्या केली तर 90 जणांचे गेल्या तीन महिन्यांच्या काळात कोरोनाने बळी घेतले आहेत. तर उपचारानंतर डिस्चार्ज मिळालेल्या रूग्णांची संख्या 1344 असून, सध्या सर्वोपचारच्या कोरोना वॉर्डांमध्ये दाखल होवून उपचार घेणारे अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रूग्ण 387 आहेत.  

हॉटेल, गेस्ट हाऊस, लॉजिंगला सशर्त परवानगी

दरम्यान, शहरातील हॉटेल, गेस्ट हाऊस, लॉजेस सुरु करण्यास जिल्हा प्रशासनाकडून सशर्त परवानगी देण्यात आली असून, याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना बंधनकारक करण्यात आल्या आहेत. हॉटेल, गेस्ट हाऊस, लॉजेस आपल्या क्षमतेच्या 33 टक्के इतकेच सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. कंटेन्मेन्ट झोन, प्रतिबंधित क्षेत्र वगळून हा आदेश लागू राहील. या आदेशाचा भंग करणाऱ्या संबंधित व्यावसायिकाविरुध्द कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

कोरोना पॉझिटिव्‍ह रूग्‍णांच्‍या संपर्कात आलेल्या संशयीत नागरिकांची तसेच सर्दी, ताप, खोकला अशी कोरोना सदृश्‍य लक्षणे असलेल्‍या नागरिकांची चाचणी सहजरित्‍या व जलदगतीने व्‍हावी यासाठी अकोला महानगरपालिका, जिल्‍हा प्रशासन आणि जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक यांच्‍या सहकार्याने स्‍वॅब कलेक्‍शन सेंटर सुरू करण्यात आले आहेत. पूर्व झोन अंतर्गत मोठी उमरी येथील शिवाजी टाऊन शाळा येथील स्‍वॅब कलेक्‍शन सेंटरवर 99 नागरिकांच्या घश्यातील स्‍त्रावाचे नमुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञ डॉक्‍टरांकडून घेण्‍यात आले.