Corona Virus Image

शेगाव (जि.बुलडाणा) (Shegaon). शुक्रवारी सकाळी शहरातील व्यंकटेशनगर भागातील एका ५४ वर्षीय कोरोनाबाधिताचा अकोला रूग्णालयात मृत्यू झाला. याआधी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने येथील मृतकांची संख्या ३ झाली आहे.

व्यंकटेशनगर भागातील गोपाल गायकी यांना कोरोना झाल्याने सुरूवातीला सईबाई मोटे उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे तीन- चार दिवस उपचार घेतल्यानंतर ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने त्यांना अकोला येथील शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले़ मात्र तेथे उपचारा दरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला़ त्यांच्या मृतदेहावर अकोला येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले़ कोरोनामुळे मृत्यू झाल्याची गत पंधरा दिवसातील ही दुसरी घटना आहे़ दहा दिवसांपूर्वी येथील सईबाई मोटे रूग्णालयात उपचार घेत असलेल्या व्यंकटेशनगरातील एका ६५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता, तर सुरूवातीच्या काळातच एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला होता. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या तर झपाट्याने वाढतच आहे, शिवाय मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.