दुस-यांदा नियम मोडल्यास होणार फौजदारी कारवाई

शिस्त लावण्यासाठी दंडात्मक कारवाईची निर्देश

यवतमाळ,

गेल्या आठवडाभरापासून यवतमाळ शहरासह विविध तालुक्यात कोरोणाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. अनेक ठिकाणी नागरिकांकडून शासनाच्या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी  कोरोना सारख्या संसर्ग आजाराला चालना मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना शिस्त लागावी म्हणून दंडात्मक कारवाईचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. तसेच दुस-यांदा नियम मोडणा-यांना थेट फौजदारी कारवाई होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

यामध्ये तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन, धुम्रपान करतांना व थुकतांना आढळल्यास रुपये 1000 रुपये दंड व 1 दिवस सार्वजनिक सेवा, दुस-यांदा आढळल्यास रुपये 3000 दंड व 3 दिवसाची सार्वजनिक सेवा, तिस-यांदा व त्यानंतर आढळल्यास रुपये 5000 दंड व 5 दिवस सार्वजनिक सेवा द्यावी लागेल. त्याचप्रमाणे सार्वजनिक स्थळी चेह-यांवर मास्क न वापरणे यासाठी रुपये 200 दंड व त्यानंतर पुन्हा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. दुकानदार, फळे, भाजीपाला विक्रेते, सर्व जीवनावश्यक वस्तु विक्रेते आणि ग्राहक यांनी सामाजिक अंतर न राखणे तसेच विक्रेत्यांनी मार्कींग न करणे यासाठी ग्राहकांना रुपये 200 दंड तर विक्रेत्यांना रुपये 2000 दंड आकारण्यात येईल. दुस-यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल. किराणा जिवनावश्यक वस्तू विक्रेत्याने वस्तूंचे दरपत्रक न लावणे यासाठी रुपये 2000 दंड व दुस-यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल.

 
सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने जाहिरात, व्यापार व पुरवठा आणि वितरण कायदा-2003 मधील कलम 4 नुसार रुपये 200 दंड, कलम 5 नुसार पहिल्या गुन्ह्यासाठी 1000 दंड किंवा 2 वर्षे शिक्षा, दुसऱ्यांदा आढळल्यास रुपये 5000 दंड किंवा 5 वर्षे शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा देण्यात येईल. उत्पादनाकरिता  कलम 7 नुसार पहिला गुन्हा रुपये 5000 दंड किंवा  2 वर्ष शिक्षा, दुसरा गुन्हा रुपये 10000 दंड किंवा पाच वर्षाची शिक्षा, तसेच विक्रेत्यांकरिता पहिला गुन्हा 1000 दंड किंवा 1 वर्ष शिक्षा, दुस-यांदा आढळल्यास रुपये 3000 दंड किंवा 2 वर्ष शिक्षा देण्यात येईल.

सदर आदेशाचे पालन न करणा-यां कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांचेवर साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणी भारतीय दंड संहिता 1860 तसेच इतर संबंधीत कायदे व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद केले आहे.