पावसाळ्यातही भूजल पातळीत घट

भंडारा, 

पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती कोरडवाहू असल्याने रोवणी खोळंबली आहे. अनेक ठिकाणी विहिरीतील पाणी कमी पडत आहे. सिचंनाच्या सुविधा असतानाही विजेअभावी शेतकऱ्यांना रोवणी करता येत नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वीज  भारनियमन कमी करा, अशी मागणी केली. अनेकांनी वीज पुरवठा खंडित होत असल्याने इंजिन लाऊन पिकांना  पाणी देणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा निसर्गापुढे हतभल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

येत्या काही दिवसात संततधार पावसाने हजेरी न लावल्यास दुष्काळ पडण्याची शक्यता दिसून येत आहे. आधीच कोरोनामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच अनेकांनी खरीप हंगामासाठी बँकेचे कर्ज तसेच उसनवार करून पैशाची जमवाजमवी केली आहे. मात्र पावसाअभावी उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तलावांच्या जिल्ह्यात शेतकरी तहानलेला

 तलावाचा जिल्हा म्हणून प्रसिद्धीस आलेल्या भंडाऱ्यात बहुतांश भागातील शेतकरी पाणीसमस्येमुळे चांगलेच त्रस्त आहे. तलावांच्या खोलीकरणाअभावी व पाणी सिंचनाच्या योग्य नियोजनाअभावी या भागातील शेतकऱ्यांना पाहिजे त्याप्रमाणात उत्पादन घेता येत नाही. परिणामी या भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या पिछाडलेला आहे. शेती करावी की, विकावी या विवंचनेत दिसून येतो.

विशेष म्हणजे, या जिल्ह्यात जवळपास शेकडो तलाव आहे. मात्र, यापैकी बरेचसे तलाव खोलीकरण आणि नियोजनाअभावी अखेरची घटका मोजत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या विकासाला ग्रहण लागले आहे. या भागामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये विहिरपंप सारखी कृत्रिम व्यवस्था आहे. विहिरींना मुबलक पाणीसाठा आहे. अशाच शेतकऱ्यांचे शेत हिरवेगार दिसून येतात. परंतु, त्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढी असेल. इतर बहुतांश शेतकऱ्यांपुढे पाणी समस्या आवासून उभी आहे.