गुप्तांगातून स्वॅब घेणाऱ्या हॉस्पिटलची तोडफोड

  • नगरसेवकांचा रोष उफाळला

बडनेरा,
कोरोना थ्रोट स्वॅब तपासणीसाठी गेलेल्या एका 24 वर्षीय तरुणीशी अश्लील कृत्य करण्यात आल्याच्या घटनेचा रोष व्यक्त करून एमआयएमचे नगरसेवक मोहम्मद इमरान आणि शिवसेनेचे नगरसेवक ललित झंझाळ यांनी बुधवारी बडनेऱ्यातील मोदी हॉस्पिटलमध्ये जाऊन तोडफोड केली. या तोडफोडीत डॉक्टरच्या कॅबीनसह खुर्च्यांची तोडफोड आणि खिडकींच्या काचा फोडण्यात आल्या.

31 पर्यंत पोलिस कोठडी
मोदी हॉस्पिटल येथील लॅब टेक्नीशियन अल्पेश देशमुख (30, रा. पुसदा) याने कोरोना चाचणीवेळी एका 24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगात टेस्टिंग स्टिक टाकल्याची घटना उघड झाली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी अल्पेशविरुद्ध गंभीर गुन्ह्याची नोंद केली. त्याला तत्काळ अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 31 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मनसेही आक्रमक
मोदी हॉस्पिटल येथील लॅब टेक्निशियनविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेऊन हॉस्पिटलसमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी मनसेचे महानगर अध्यक्ष संतोष बद्रे यांच्या नेतृत्वात मोदी हॉस्पिटलचे प्रमुख वी. के. सिंग यांना निवेदन देण्यात आले. याशिवाय मनसेने सीएस श्यामसुंदर निकम यांनाही निवेदन सादर केले. यावेळी शहर अध्यक्ष गौरव बांते, राजेश देशमुख, प्रवीण डांगे, शहर उपाध्यक्ष विवेक पवार, अजय महल्ले आदी उपस्थित होते.

खासदार नवनीत राणा संतप्त
मोदी हॉस्पिटलमधील संतापजनक प्रकार पाहून खासदार नवनीत राणा संतप्त झाल्या. या घटनेवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता पीडित मुलीला न्याय मिळावा, यासाठी मी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा खासदार नवनीत यांनी दिला. ज्या जिल्ह्याने देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील, महिला खासदार नवनीत राणा, महिला पालकमंत्री दिले आहेत, त्या जिल्ह्यात असे धक्कादायक प्रकार होताहेत. त्यामुळे कोविडसाठी कंत्राटी कर्मचारी घेण्यापूर्वी त्यांची माहिती काढायला पाहिजे.
फोटो खासदार राणा

अत्यंत गंभीर कृत्य
मोदी हॉस्पिटलमधील घटनेबद्दल शिवसेना प्रमुख सुनील खराटे यांनीही संताप
व्यक्त करून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गुरुवारी त्यांनी बडनेरा पोलिस ठाणे आणि मोदी हॉस्पिटलला भेट देऊन माहिती घेतली. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्याशी संवाद साधून टेक्नीशियनची पूर्ण माहिती घेऊनच नियुक्ती करावी, असे सांगितले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.