जि. प. परसोडी शाळेतील अभिनव उपक्रम : गुरुजी आपल्या दारी

परसोडी.  गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील जिल्हा परिषदेची परसोडी शाळा सतत आपल्या नाविन्यपूर्ण आणि अभिनव उपक्रमासाठी प्रसिद्ध आहे. वर्षभर या शाळेत राबवित असलेल्या विविध उपक्रम आणि गुणवत्ता विकासामुळे या वर्षी कोरोना काळात सुद्धा मागील वर्षी १५४ असलेली पटसंख्या २०० च्या पुढे जाताना दिसून येत आहे. कोरोना काळात विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहण्यासाठी शाळेने ऑनलाईन शिक्षण एक पर्यायी व्यवस्था म्हणून स्वीकारली. शाळा बंद पण शिक्षण सुरु या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषद पुणे ने सुरु केलेला अभ्यास पण सुरु ठेवला. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच झाला. परंतु ज्या पालकांकडे मोबईल नाही, अशा विद्यार्थ्यांची समस्या निर्माण झाली. अशा विद्यार्थ्यांसाठी गोंदिया जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी  (प्राथमिक)मा. राजकुमार हिवारे यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच शाळा जरी बंद असतील तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहावे यासाठी ‘गृहमाला’ या अभिनव उपक्रमांची संकल्पना समोर आणली.
                     

या शाळेने गृहमाला उपक्रम पद्धतशीर व नियोजन पद्धतीने मागील एक महिन्यापासून राबविण्यास सुरवात केली. गृहमाला उपक्रमात गुरुजी स्वत: विध्यार्थ्यांच्या घरी जातांना आधीच तोंडाला मास्क लावून असतात.विध्यार्थी सुद्धा मास्क बांधलेले असतात. घरी गेल्याबरोबर अंगणात ठेवलेल्या साबनाणे स्वच्छ हात धुतल्यावरच विध्यार्थ्यांना सोबत नेलेल्या व्हाईट बोर्डवर मार्गदर्शन करतात.त्यानंतर त्यांना अभ्यास गुहकार्यासाठी देतात.अशा प्रकारे कोरोना विषयक सर्व मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून “गुरुजी आपल्या दारी” हा उपक्रम राबवीत आहेत.या उपक्रमांमुळे विद्यार्थी  अभ्यास करताना दिसून येत आहेत. कोरोना काळात सुद्धा विद्यार्थ्यांचा  ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीचा ताळमेळ व समीकरण साधून शाळा बंद पण अभ्यास सुरु या शाळेने ठेवलेला आहे. शाळेचे मुख्याध्यापक हिवराज परशुरामकर,शिक्षक जगदीश शहारे, इस्राइल दुधकनोज,नीलकंठ कोरे,प्रतिभा शहारे, अरुण शिवणकर,उपक्रमशील शिक्षक हुमेंद्र चांदेवार यांच्या सहकार्यातून उपक्रम यशस्वी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. गटशिक्षणाधिकारी के.वाय.सर्याम,केंद्रप्रमुख कापगते, टी.एम.राऊत,सुनील राऊत आदींनी शाळेचे अभिनंदन केले आहे.