पेट्रोल-डिझेल दरवाढ विरोधात कॉंग्रेसचा एल्गार

 दरवाढ कमी करण्याची मागणी

देसाईगंज. सर्वसामान्य नागरिक आधीच कोरोना महामारीमुळे त्रस्त असतांनाच केंद्र शासनाद्वारे मागील पंधरवड्यापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात केलेल्या अवाढव्य वाढीमुळे सर्वसामान्य अधिकच होरपळून निघाला आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयाविरोधा कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून तत्काळ दरवाढ कमी करुन शेतकरी व सर्वसामान्य जनतेला न्याय द्या, अशी मागणी युवक व अल्पसंख्याक काँग्रेसने केली आहे. यासंदर्भातील निवेदन माजी आ. आनंदराव गेडाम यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फतीने केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना सादर करण्यात आले आहे.

     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलची भाववाढ करून केंद्र सरकार सर्वसामान्य नागरिकांवर एक प्रकारे अन्याय करीत आहे. सरकारला महसूल वाढीसाठी अनेक पर्याय आहेत. मात्र केंद्र सरकार कडून तसे न करता पेट्रोल-डिझेल ची भाववाढ करून सर्वसामान्यांची थट्टा करण्यात येत आहे. कोरोना विषाणू व अशातच लॉकडाऊन व नंतर सामान्यांच्या हाताला काम नाही. अशातच पेट्रोल-डिझेलची भाववाढ केल्यानं जीवनावश्यक वस्तूंसह इतर वस्तूंच्या किंमती वाढविणे साहजिकच आहे. मात्र पेट्रोल-डिझेल भाववाढीमुळे वाढलेल्या किंमतीला केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलची भाववाढ थांबवून पेट्रोल-डिझेलच्या किमती २० ते 3० रुपये कमी करून शेतकरी,गोरगरीब, सामान्यांना न्याय द्या, अशी मागणी युवक व अल्पसंख्याक काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

निवेदन देतांना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष परसराम टिकले, अल्पसंख्याक काँग्रेसचे प्रदेश सचिव शहेजाद शेख, अल्पसंख्याक काँगेसचे जिल्हाध्यक्ष लतीफ रिजवी, युकॉ अध्यक्ष पिंकू बावणे, महिला तालुका काँग्रेस अध्यक्ष आरती लहरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मिलिंद सपाटे, ओबीसी शहर अध्यक्ष नितीन घुले, लीलाधर भर्रे, राकेश पूरनवार, कपिल बोरकर, भूषण राऊत, संदीप मंडपे, नरेश लिंगायत, भुवन लिल्हारे, मंगेश राऊत, दिनेश खोब्रागडे, नजीर यासिनी, कुरेश, जाईद शेख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.