निधीत अडकले इकॉर्नियाचे निर्मूलन

 फाईल पुन्हा नियोजन विभागाकडे

भंडारा,

भंडाऱ्याची जीवनदायीनी वैनगंगा नदीच्या सौंदर्याला इकॉर्निया वनस्पतीमुळे ग्रहण लागले आहे. दरवर्षी इकॉर्नियामुळे वैनगंगेचे दोन्ही पात्र गिळंकृत झालेले आहे. या इकॉर्नियाचे उच्चाटन करण्यासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानमध्ये दोन कोटींची तरतूद करून इकॉर्निया निर्मुलनाची कारवाई सुरू  करावी, असे निर्देश वर्षभरापूर्वी तत्कालीन पालकमंत्र्यांनी दिले होते. परंतु, जिल्हा खनिज प्रतिष्ठानमध्ये तेवढा निधी नसल्यामुळे ही फाईल पुन्हा नियोजन विभागाकडे देण्यात आली.

गोसेखुर्द धरणामुळे वैनगंगेचे पाणी अडविण्यात येते. या नदीमध्ये नागपूर शहरातून वाहत येणाऱ्या नागनदीचे पाणी मिसळले जात असल्याने वैनगंगेचे पाणी दूषित होते. या दूषित पाण्यामुळे वैनगंगेत इकॉर्निया वनस्पतीची उत्पत्ती झाली. ही वनस्पती संपूर्ण नदीचे पाणी गिळंकृत करत आहे. वनस्पतीचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने संपूर्ण पात्र जणू हिरवा लॉन असल्यासारखे दिसत आहे. ही वनस्पती विषयुक्त नसली तरी त्यामुळे नदीतील जलचर प्राण्यांवर परिणाम झालेला आहे. नदीचे पाणी अधिकच दूषित होत असल्याने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

ऑगस्ट 2019 मध्ये वैनगंगा नदीमध्ये असलेल्या इकॉर्निया वनस्पतीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी यंत्रसामुग्री लावून नदी स्वच्छ करण्यासाठी जिल्हा खनिजकडे 2 कोटी रुपयांची तरतूद करावी, इकॉर्निया निर्मुलनाची कारवाई त्वरित सुरू करावी, अशा सूचना तत्कालीन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. परंतु, एवढा निधी जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडे उपलब्ध नाही. जिल्हा खनिज प्रतिष्ठानमधील निधीतून वर्ग खोल्या बांधणे, रस्त्याची बांधणी, शाळेचे साहित्य आदी लहान कामे केली जातात. त्यामुळे दोन कोटींच्या खर्चाचा निधी त्यांच्याकडे नाही. त्यामुळे जिल्हा खनिकर्म विभागाने पुन्हा हे प्रकरण जिल्हा नियोजन विभागाकडे पाठविण्यात आले.

वैनगंगा नदीवर भंडारा, तुमसर, पवनी येथे शहरांसह अनेक लहानमोठ्या गावांतील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. इकॉर्नियामुळे मासेमारी आणि पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.