विद्युत धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

सावली. सावली तालुक्यातील सामदा येथे शेतातील मोटर पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला (Farmer) विद्युत धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक २२ रोजी सकाळी ७ च्या सुमारास घडली. रूपेश बुरले (वय ४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मागील तीन दिवसापूर्वी सावली तालुक्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच सामदा येथे शेतातील पुराचे पाणी ओसरल्यावर सदर शेतकरी हा शेताकडे पाहणी करण्यासाठी गेला असता शेतातील मोटर पंपाचा विद्युत केबल अस्ताव्यस्त पडून असल्याचे त्याला दिसले ते सावरण्यासाठी तो गेला असता अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने सदर शेतकऱ्याचा विद्युत धक्क्याने जागीच मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृतकाच्या पश्चात वडील, पत्नी, भाऊ व दोन लहान मुली असा आप्त परिवार आहे.