विदर्भात महापुराने पिकांचे अतानोत नुकसान; धान उत्पादक संकटात

गडचिरोली. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून (Gosekhurd dam) इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा (wainganga river) व तिच्या उपनद्यांना महापूर आला. पुरामुळे (flood)  नदी काठावरील गावे व शेतजमिनीचे अतोनात नुकसान झाले. शेकडो हेक्टरवरील पिके भूईसपाट झाली. याशिवाय भंडारा गोंदिया जिल्ह्यात हातातोंडाशी आलेले धानाचे पीक पाण्याखाली आल्याने धान उत्पादकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या महापुरामुळे जिल्ह्यातील तब्बल १२ मार्ग तीन दिवस बंद होते. या महापुराच्या नुकसानीची लोकप्रतिनिधींनी पाहणी करुन नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या.

शेतक-यांना एकरी १० हजाराची नुकसान भरपाई द्या : नगराध्यक्ष
पुरामुळे गडचिरोली शहरातील बोरमाळा रोड, विसापूर, हनुमान वार्ड, लांझेडा व अन्य भागातील शेतक-यांच्या धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. धान पीक पुराच्या पाण्याखाली सापडले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले असून नुकसानग्रस्त शेतीचा सर्वे करून नुकसानग्रस्त शेतक-यांना एकरी १० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.