नवरदेव निघाला कोरोना पॉझिटिव्ह

30 जूनला झाले लग्न  

वर्धा,

शहराजवळील पिपरी मेघे येथील वार्ड क्रमांक 4 मध्ये बुधवारी एक कोरोना पॉझिटिव्ह मिळाला. त्याचे लग्न 30 जून रोजी झाले होते. विशेष म्हणजे, चार दिवसांपूर्वी याच परिसरातून महावितरणचा कर्मचारी पॉझिटिव्ह मिळाला होता. तरुणाच्या लग्नात 100 ते 150 जण सहभागी झाले होते, अशी माहिती आहे. त्यामुळे परिसर सील करून निकटवर्तीयांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पिपरी मेघे येथे वार्ड क्रमांक 4 गणेश मंदिर येथील 32 वर्षीय तरूणाचे 30 जून रोजी लग्न झाले होते. या लग्नाला अमरावती व यवतमाळ वरून मोठ्या प्रमाणात नातेवाईक आले असल्याची माहिती आहे. अंदाजे 100-150 जण लग्नामध्ये सहभागी झाले होते. नवरदेवाचे प्रेसचे दुकान आहे. लग्नानंतर त्याने दुकानही उघडले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी त्याच्यामध्ये कोरोनाचे लक्षण दिसून आले. त्यामुळे त्याला क्वारंटाईन करून त्याचे स्वॅब घेण्यात आले. दरम्यान त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. कुटुंबातील लोकांना  क्वारंटाईन करून परिसर सील करण्यात आला आहे.