उपचारासाठी पहावी लागली २४  तास वाट; कोविड केअर सेंटर मधील प्रकार

कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या वृध्द महिलेसह तीन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. परंतु, आरोग्य विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे त्यांना उपचारासाठी २४ तास वाट पहावी लागली. एकीकडे अधिकारी कर्तव्यदक्ष असण्याचा दावा करीत आहे. तर, अशा घटनांमुळे त्याचे पितळ उघडे पडत आहे.

बाधितांमध्ये वृध्देचाही समावेश; आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष

वर्धा: कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या वृध्द महिलेसह तीन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. परंतु, आरोग्य विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे त्यांना उपचारासाठी २४ तास वाट पहावी लागली. एकीकडे अधिकारी कर्तव्यदक्ष असण्याचा दावा करीत आहे. तर, अशा घटनांमुळे त्याचे पितळ उघडे पडत आहे.
माहितीनुसार गौरक्षणवार्ड येथील ६० वर्षीय महिला, ३४ वर्षीय युवक व ४ वर्षीय बालिकेत कोरोना आजाराचे लक्षण आढळून आल्याने हनुमान टेकडी परिसरात असलेल्या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले. मंगळवारी त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. कोविड नियमानुसार त्यांना तत्काळ सेवाग्राम किंवा सावंगी येथील डेडीकेटेड रूग्णालयात पाठविणे गरजेचे होते. यामुळे कोविड सेंटरमध्ये असलेल्या अधिका-यांनी आरोग्य प्रशासनाला सूचना दिली. बाधितांमध्ये ६० वर्षीय महिलेचा समावेश असल्याने ही बाब गंभीरतेने घेणे गरजेचे होते.परंतु,आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केले. रात्रभर तिनही बाधितांवर कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यात आला नाही. त्यांना जवळपास २४ तास उपचारासाठी वाट पहावी लागली. प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षितपणामुळे कोविड सेंटरमध्ये असलेल्या अन्य रूग्णांमध्येही असंतोष निर्माण झाला आहे. याची माहिती जिल्हाधिका-यांना दिल्यानंतर बुधवारी तिनही रूग्णांना कोविड सेंटरमधून रेफर करण्यात आले. कोरोनाबाधित वृध्द महिलेची प्रकृती अधिक बिघडली असती तर यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

गरम पाण्याची सुविधा नाही
हनुमान टेकडी परिसरात ५ व हिंदी विश्वविद्यालयाचे राजगुरू वसतीगृहात १ असे एकूण ६ कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. सावंगी व सेवाग्राम रूग्णालयातून सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांना येथे ठेवण्यात येते. अशा रूग्णांना सतत गरम पाण्याची गरज भासते. परंतु, कोविड केअर सेंटरमध्ये पाणी गरम करण्यासाठी मशीन नसल्याने रूग्णांची अडचण वाढली आहे. यांसह कोविड केअर सेंटरमध्ये अन्य सुविधा उपलब्ध नसल्याची माहिती आहे.

अतीसौम्य होते लक्षण
पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रूग्णांमध्ये अती सौम्य लक्षण होते. भीती बाळगण्याचे कोणतेही कारण नव्हते. कोविड सेंटरमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध आहे. रूग्णांना डेडीकेटेड रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विवेक भीमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.