लग्नाचा अनावश्यक खर्च टाळून निराधारांना केली मदत

  • पाहुण्यांचे मास्क व सॅनिटायझरने स्वागत...
  • निराधारांच्या हितार्थ सरसावले सचीन- कविता या नवदाम्पत्याचे हात...!
  • अनावश्यक खर्च टाळून दिला वधू-वरांनी २१ हजाराचा धनादेश दिव्या फाऊंडेशनला

 सालेकसा. दिमाखदार लग्न सोहळ्यावर कोरोना विषाणूने  निर्बंध आणले तरीही विवाह सोहळ्यात अनाठायी खर्च केला जातो. मात्र आमगाव तालुक्यातील एका लग्नगाठीने निराधारांची मने जोडली आहे. बुलडाणाच्या दिव्या फाऊंडेशन या सामाजिक संस्थेला अनाथ अपंग बेघर बेसहारा मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेला सेवेसाठी तसेच गोर-गरीब मुलांच्या शिक्षणासाठी  २१  हजार रुपयांचा निधी देऊन कालिमाठी येथील सचीन फुंडे व कविता  बोहरे या नवदाम्पत्याने एक आदर्श समोर ठेवला आहे. तसेच लग्नामध्ये विशेष ठरले ते म्हणजे दिव्या फाऊंडेशनच्या समन्वयकांनी वधूवरांना दिलेल्या भारतीय संविधानाची प्रत ! भारतीय संविधानाच्या विचारांनी वधू-वरांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळून विचारांची बिजे रोवली जावोत हा एक प्रयत्न दिव्या फौंडेशन ह्यावेळी केला.  लोकांपर्यंत सामाजिक संदेश देत दिव्या फाउंडेशन’चे मास्क वाटप करण्यात आले. इतरांनीही लग्नातील व्यर्थ खर्च टाळून सामाजिक भान जपावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अनेकदा लग्न करणा-यांची ऐपत नसतांनाही आपल्या वडिलोपार्जित शेतीतील एकर-अर्धा एकर जमिनीचा तुकडा विकून या प्रथा सांभाळल्या जातात. त्याला फाटा देण्याचे धाडस आर्थिकदृष्ट्या सक्षम असतांना, फुंडे व बोहरे कुटुंबाने केले आहे. सचिन हेमलता हेमंतराव फुंडे  व कविता श्रीराम बोहरे  यांचा ठरल्याप्रमाणे विवाह स्वातंत्र्यदिनी वधूच्या घरीच विवाह संपन्न झाला.

या वेळी लग्नसोहळ्यात  आलेल्या सर्व पाहुण्यांचे हसतमुखाने मास्क व सॅनिटायझर देऊन स्वागत केले. मात्र कुणालाही  अन्य प्रकारचे मानपान केले नाही. बदलत्या काळात विवाह सोहळे अतिशय राजेशाही होत आहेत. थाटामाटात लग्न व्हावे ही प्रत्येक नववधूसह त्यांच्या माता- पित्यांची असते. मात्र कोरोना काळात पैशांची वारेमाप उधळपट्टी न करता सामाजिक दायीत्व जपण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी छापण्यात आलेल्या लग्नपत्रिकेवरही समाजाला मदतीचा हात देण्याचे आवाहन करणारा मजकूर लक्ष वेधी होता. लग्न संपन्न झाल्यावर वर व वधूंच्या हस्ते गोरगरीब, दीन दुबळे, निराधार तसेच अनाथ, अपंगांसाठी कार्य करणाऱ्या दिव्या फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक काकडे यांना संस्थेच्या समाजिक उपक्रमांसाठी २१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. यावेळी मोजके पाहुणे,पत्रकार, गावकरी, दिव्या फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक काकडे, दिव्या फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक चंद्रकुमार बहेकार, सालेकसा पत्रकार संघाचे अध्यक्ष पवन पाथोडे, राकेश रोकडे, विजय बहेकार, संध्या फुंडे, राजेशजी गोयल, जीवन मुपडे, सुभाष रणदिवे, गजानन अवसरमोल, रेखाताई चुटे, गणेश शेंडे,  सुमन दोनोडे,  निखिल फुंडे  यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्च टाळून उपेक्षितांसाठी मदतनिधी दिल्याने  सचीन – कविताची रेशीम गाठ खऱ्या अर्थाने घट्ट झाली आहे. वधू-वरांनी उचललेलं पाऊल जनहितार्थ असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.