महामार्गावर भीषण अपघात : एक ठार

दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह तिघे जखमी

गोंदिया,

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सावंगी गावानजीक ट्रकचालकाच्या चुकीमुळे मागून येणाऱ्या स्विफ्ट कार ट्रकला धडकली. यात स्विफ्ट कारमध्ये बसलेला एका जणाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. तर कारमध्ये बसलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह तिघेजण गंभीररित्या जखमी झाले. ही घटना सोमवारी(ता. १३) सायंकाळच्या सुमारास घडली. मृताचे नाव राकेश बनसोड (वय २७, रा. सुकडी) असे आहे.

सविस्तर असे की, सोमवारी सायंकाळच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कोहमारा नजीक स्विफ्ट कार( एमएच ३५, पी ६७४५) भरधाव वेगात येत होती. कारच्या मागे ट्रक(पीबी ०८, बीटी ९०३२) जात होता. सावंगी गावानजीक ट्रकचालकाने ब्रेक दाबून ट्रक बल ढाबाकडे जाण्याकरिता ट्रक वळविला. ट्रकच्या मागून भरधाव वेगात येणाऱ्या स्विफ्ट कारने ट्रकच्या उजव्या बाजूला धडक दिली. भरधाव वेगात असल्याने स्विफ्टकारच्या चिंधड्या उडाल्या. यात कारमधील चालकाच्या बाजूला बसलेला राकेश बनसोड याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. तर कारमध्ये बसलेले पोलिस शिपाई प्रशांत मेश्राम(वय ३५, रा. गोंदिया), पोलिस हवालदार दादुजी बोरकर(वय ५६, रा. डोंगरगाव) आणि वैभव गजभिये(वय ३० रा. सुकडी) हे गंभीररित्या जखमी झाले. जखमींना तातडीने पोलिसांनी उपचाराकरिता रुग्णालयात नेले. डुग्गीपार पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शेंडे करत आहेत.