चाचण्या वाढविल्याने बाधितांच्या संख्येतही वाढ

नागरिकांनी घाबरू नये:  वडेट्टीवार
सावलीत कमलाकर बटे यांना 50 हजाराची आपत्ती मदत

चंद्रपूर,

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. येणाऱ्या काळात आणखी बाधितांची संख्या कदाचित वाढेल. कारण स्वॅब तपासणी चाचण्या वाढल्या आहेत. उपचारांमध्ये प्रत्येक बाधितांची वेगळी काळजी घेतली जात असून संपूर्ण सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवा. वाढत्या संख्येने घाबरून जाऊ नका, असा संदेश जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील जनतेला दिला आहे.

सावली तहसील कार्यालयामध्ये आयोजित कोरोना संदर्भात आढावा बैठकीमध्ये ते मार्गदर्शन करत होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांकडून नैसर्गिक आपत्तीत वीज पडून दोन बैल ठार झाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी कमलाकर रुमाजी बटे यांना 50 हजार रुपयाचा धनादेश तहसील कार्यालयाच्या वतीने त्यांनी दिला. नैसर्गिक आपत्तीत शासन प्रत्येक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यांमध्ये दर दिवसाला साडेतीनशेच्या आसपास टेस्ट होत आहेत. जिल्ह्यांमध्ये 2.18 कोटी रुपये खर्च करून कोरोना  चंद्रपुरात प्रयोगशाळा सुरू केली आहे. येथील प्रयोगशाळेसोबतच नागपूर येथील दोन्ही प्रयोगशाळेत स्वॅब नमुने पाठवण्यात येत आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. पुढील काही दिवसात आणखी बाधित संख्या वाढण्याची शक्यता आहे. जितक्या चाचण्या अधिक होतील. तितके हॉटस्पॉट तयार करून, प्रतिबंधित क्षेत्र तयार करून, कोरोना आजाराची लढता येईल, ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

 सावलीची जाणून घेतली स्थिती

कोरोना संदर्भात त्यांनी सावली तालुक्यातील सद्यस्थिती जाणून घेतली. सावलीत सध्या अलगीकरणात 65 नागरिक आहेत. जवळपास 173 नमुने सावली तालुक्यातून घेण्यात आले आहे. यातील 23 नमुने सध्या प्रतीक्षेत आहेत. अन्य सर्व निगेटिव्ह आहेत. यावेळी त्यांनी नजिकच्या मूल येथून अधिक बाधितांचा आकडा वाढत असून या ठिकाणची आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे निर्देश दिले. क्वारंटाईन मध्ये उत्तम सुविधा राहतील याकडे कटाक्षाने लक्ष द्या, जिल्हाभरातील ग्रामपंचायतींना यासाठी 25 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणखीही निधी लागला तर तो वितरित केल्या जाईल. मात्र, गावात येणाऱ्या नागरिकांचे अलगीकरण झालेच पाहिजे. याकडे लक्ष वेधण्याची सूचना त्यांनी या वेळी केली.

अन्य विषयांवरही चर्चा

या बैठकीमध्ये त्यांनी कोरोना सोबतच अन्य विषयांबद्दलही तालुक्यातील माहिती घेतली. यामध्ये प्रामुख्याने गरिबांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना, तालुक्यातील सर्व पांदण रस्ते, पूल, याबाबत योग्य आराखडे तयार करा, 100 टक्के धान्य वितरण, शाळांची सुरुवात, आरोग्य विषयक सूचना, औषधांची उपलब्धता, साथ रोगनिवारण, शेतकऱ्यांना खतांची उपलब्धता, बियाण्यांची उपलब्धता, पिक कर्ज, तसेच 31 जुलैपर्यंत मुदत असणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी लक्ष देण्याचे आवाहन केले.

बैठकीला तहसीलदार परिक्षित पाटील, गटविकास अधिकारी अमोल भोसले, नायब तहसीलदार सागर कांबळे, सावली नगरपंचायतचे मुख्याधिकारी मनीषा कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी मनोहर मडावी, वैद्यकीय अधीक्षक यमुनाताई मडावी, उपअभियंता कटरे आदी उपस्थित होते.