ग्रामपंचायत कार्यालयात सदस्याचा गोंधळ ; सरपंचास शिवीगाळ

वर्धा: पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी का गेले? या कारणावरून संतप्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्याने ग्रामपंचायत कार्यालयात गोंधळ घातला. इतकेच नाही तर पिता – पुत्राने सरपंचास शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना शहराला लागून असलेल्या बोरगाव मेघे ग्रामपंचायत कार्यालयात घडली.

माहितीनुसार बोरगाव मेघे येथील ग्रामपंचायत वार्ड क्रं. 5 येथील सदस्य मनोज गणेशलाल चौधरी (50) यांचा दुकानाचे गाळयावरून अशोक मेश्राम यांचेशी वाद सुरू होता. ही बाब मेश्राम यांनी सरपंच संतोष सेलुकर यांना सांगितली. यानंतर सेलुकर हे मेश्राम यांना घेऊन शहर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पोहोचले. यामुळे संतप्त झालेले ग्रामपंचायत सदस्य मनोज चौधरी व त्यांचा मुलगा सौरभ चौधरी दोघेही ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले. तिथे सरपंच संतोष सेलुकर व सचिव उपस्थित होते. त्यांचे समोरच सरपंच सेलुकर यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी सरपंच सेलुकर यांचे तक्रारीवरून शहर पोलिसांनी मनोज चौधरी व सौरभ चौधरी यांचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.