लॉकडाऊन : मिळावे पूर्णपणे स्वातंत्र्य

  • पूर्ववत व्हावे जनजीवन

वर्धा.     कोरोना संक्रमणामुळे शासनाने अनेक निर्बंध लावले. परंतु, अजुनही पूर्णपणे स्वातंत्र्य देण्यात न आल्याने याचा परिणाम व्यापाऱ्यांवर आणि सामान्य नागरिकांच्या जनजीवनावर होत आहे. शाळा, महाविद्यालयांसह मंदिर, चर्च, मस्जिद, हॉटेल व कॅटरिंग व्यवसाय आजही बंद आहे. प्रशासनाने नागरिकांच्या गैरसोयींचा विचार करून संचारबंदी उठवावी, अशी मागणी नागरिकांकाडून केली जात आहे.  कोरोना आजाराचे संक्रमण देशात पसरताच सर्वच क्षेत्रात निर्बंध लावण्यात आले. लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर अनेकांच्या जनजीवनावर याचा परिणाम झाला. लॉकडाऊन नंतर शासनाने अनलॉकची घोषणा केली. उद्योग व व्यापारासह अन्य कामकाजाला परवानगी दिली. यातही काही नियम लावण्यात आले आहे. व्यवसाय करण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. नियम व अटी लावण्यात आल्याने व्यवसायावर याचा परिणाम होत आहे. शासकीय कार्यालयाचे कामकाज अजुनही सुरळीतपणे सुरू करण्यात आले आहे. आजही अनेक कार्यालयातील कर्मचारी कोरोनाचे संक्रमणाचे कारण समोर करीत कार्यालयातून गायब राहतात. सायंकाळी सात वाजताच बाजारात स्मशान शांतता पसरते. हॉटेल व्यवसायिकांना पूर्णपणे परवानगी न दिल्याने व्यवसायावर परिणाम होत आहे. मंगल कार्यालयासह कॅटरिंग व्यवसाय पूर्णपणे बुडाला आहे. शासनाने आंतरजिल्हा बस सेवा सुरू केली आहे. परंतु, बस अथवा खासगी वाहनाने आलेल्या नागरिकांना सात दिवस क्वारंटाईन व्हावे लागत आहे. यामुळे परवानगी असूनही नागरिक बाहेरगावी जाण्यास तयार नाही.

शाळा आणि देवालये सुरू करावी
संक्रमणामुळे मंदिर, मस्जिद, गुरूव्दारा, चर्च, विहारांना कुलुप लावण्यात आले आहे. अनेक नागरिकांची दिवसाची सुरुवात मंदिरात माथा टेकल्याने होते. जिल्ह्यातील मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी राहते; परंतु चार ते पाच महिन्यांपासून मंदिर व अन्य धार्मिकस्थळे बंद आहेत. ते खुले करण्याची मागणी होत आहे. शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात सरकारने अद्यापही ठोस निर्णय घेतलेला नाही. ऑगस्ट महिना संपायला आला आहे. आजही शाळा व महाविद्यालये बंद आहे. याचा परिणाम विद्याथ्र्यांच्या शिक्षणावर होत असून त्यांचे नुकसान होत आहे. प्रशासनाने योग्य काळजी घेऊन शाळा-काॅलेजेस सुरू करावे, अशी मागणी काही नागरिकांकडून केली जात आहे.