बुलडाणा जिल्ह्यात 7 ते 21 जुलैपर्यंत लॉकडाऊन

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची घोषणा

बुलडाणा,

जिल्ह्यात अलीकडच्या काळात कोरोना संसर्गग्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 7 ते 21 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात येत असल्याची घोषणा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकार परिषदेत केली.

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असता ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मलकापूरचे आमदार राजेश एकडे, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ उपस्थित होते. जिल्ह्यात मलकापूर, नांदुरा व मोताळा तालुक्यात यापूर्वीच 15 जुलैपर्यंत प्रशासनाने संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश लागू केले. या तालुक्यांमध्ये 15 जुलैनंतर 21 जुलैपर्यंत जिल्ह्याचे एकत्रित आदेश लागू होणार आहेत. मलकापूर उपविभाग वगळता या लॉकडाऊन कालावधीत सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उघडण्यास मुभा असणार आहे. तसेच त्याच दिवशी दुपारी 3 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत अत्यंत कडक कर्फ्यू लागू राहणार आहे. अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या नागरिकांना लॉकडाऊन कालावधीत प्रशासनाकडून पासेस वितरीत करण्यात येतील.

बुलडाण्यात प्रस्तावित लॅबचा अंदाजित खर्च 1.50 कोटी रुपये असून डॉक्टरसह 10 मनुष्यबळ प्रयोगशाळेत लागणार आहे. जिल्ह्यातील नमुने तपासणीसाठी अकोला, यवतमाळ व नागपूर येथे पाठविण्यात येत आहेत. पुढील काळात जालना येथे तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात येत असून याठिकाणी जिल्ह्यातील नमुने तपासणी करण्यात येणार आहेत.

2000 रॅपिड ॲन्टिजेंट टेस्ट किट जिल्ह्याला मिळाल्या आहेत. या माध्यमातून 30 मिनिटात निदान होणार आहे. लॉकडाऊन काळात दुचाकीवर एक, चार व तीन चाकी वाहनांमध्ये आसन क्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांना परवानगी राहील.

कोरोनाची सांख्यिकी

विदेशातून आलेल्या 3026 नागरिकांची तपासणी करण्यात आली. सध्या गृह विलगीकरणात 3352 नागरिक असून संस्थात्मक विलगीकरणात 484 नागरिक आहेत.

आयसोलेशनमध्ये 118 नागरिक आहेत. आतापर्यंत 3832 नमुने तपासणी करण्यात आले. त्यामध्ये 300 पॉझिटिव्ह, 3106 निगेटिव्ह व 372 नमुने प्रतीक्षेत आहेत.